मुंबई
maharashtra farmer loan waiver राज्यातील ६ लाख २२ हजार २०७ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत ५ हजार २९ कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. कर्जमाफीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता पुढील लाभाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. दरम्यान, कर्जमाफीच्या निकषात बसणाऱ्या मात्र मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनाही राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी मृत शेतकऱ्याच्या वारसदाराचे नाव महसुली दप्तरी नोंदविण्याच्या सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. त्यानंतर संबंधित नोंद सेवा संस्था आणि राष्ट्रीयीकृत बँकेत पूर्ण करणे आवश्यक आहे. आता आधार प्रमाणीकरणाबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात सध्या आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ३ लाख ४८ हजार आहे. यामध्ये ५० हजार ८०६ मृत शेतकऱ्यांचा समावेश आहे. पहिल्या यादीतील राज्यातील १६ लाख ९६ हजार लाभार्थी शेतकऱ्यांपैकी १३ लाख ४८ हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. त्यापैकी १२ लाख ८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.
आधार प्रमाणीकरण करताना काही शेतकऱ्यांच्या बोटांचे ठसे उमटत नसल्याने अडचणी निर्माण होत होत्या. आता ही अडचण दूर करण्यात आली असून, अशा शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण आपले सरकार केंद्र चालकांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे बोटांचे ठसे न उमटल्याने कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता कमी झाली आहे.मृत शेतकऱ्यांच्या प्रकरणात बँकांना जास्तीत जास्त सहा वारसांची नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित शेतकऱ्यांच्या वारसांनाही आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ॲग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची तसेच प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार आहे.
कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांची कर्जखाती निरंक होतील. त्यानंतर त्यांना पुन्हा पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे हे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत याच महिन्याच्या सुरुवातीला, ७ ऑगस्ट रोजी, राज्यातील ६ लाख २२ हजार २०७ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर ५ हजार २९ कोटी रुपये जमा करण्यात आले. या रकमेच्या वितरणामुळे संबंधित पीक कर्ज खाती निरंक झाली आहेत. कर्जमाफीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर अनुदान वितरीत करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी तीन टप्प्यांत नव्हे, तर दोन टप्प्यांत केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम वितरीत करण्यात आली असून, आता दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅकची प्रक्रिया पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांना पुढील लाभाची प्रतीक्षा आहे.