मुंबई
pratap sarnaik राज्यात अमराठी रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असून, मराठी शिकण्याची संधी देऊनही भाषा न शिकणाऱ्या चालकांवर कायद्याच्या चौकटीत कारवाई केली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अमराठी रिक्षाचालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, काही अमराठी रिक्षाचालकांनी कांदिवलीत रास्ता रोको आंदोलन केले. याचदरम्यान एका अमराठी रिक्षाचालकाने थेट मराठी रिक्षाचालकाला मारहाण केल्याचेही समोर आले आहे.
अमराठी रिक्षाचालकांवरील कारवाईच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संजय निरुपम यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. अमराठी रिक्षाचालकांवर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करताना कारवाईची पद्धतही त्यांनी यावेळी सांगितली.
प्रताप सरनाईक म्हणाले की, महायुतीचे सरकार रोजगारनिर्मिती करणारे सरकार आहे. राज्यात येऊन व्यवसाय करा; मात्र मराठी अस्मितेचा आदर करा. तुमचे स्वागत आहे. कोणावरही बेकायदेशीर कारवाई केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बेकायदेशीररीत्या रिक्षाचालकांवर कोणतीही कारवाई करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
मराठी शिकण्यासाठी रिक्षाचालकांना एक महिन्याची मुदत द्यावी, अशी भूमिका सरनाईक यांनी मांडली. एका महिन्यातही संबंधित चालकाने मराठी शिकले नाही, तर त्याचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करावा. मात्र, त्याआधी मराठी शिकण्याची संधी दिली पाहिजे. ही संधी देऊनही संबंधित चालकाने मराठी शिकले नाही, तर कायद्याच्या कक्षेत त्याचा परवाना किंवा बॅच निलंबित करावा लागेल, असे सरनाईक यांनी सांगितले.
या मोहिमेला सहकार्य केल्याबद्दल संजय निरुपम यांचे सरनाईक यांनी आभार मानले. शंशाक राव यांचाही आपल्याला फोन आला होता, असे त्यांनी सांगितले. त्यांनाही आपण आवाहन केले असून त्यांनी प्रतिसाद दिला आहे. तसेच आपल्या पदाधिकाऱ्यांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतल्याचे सरनाईक यांनी नमूद केले. या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
मात्र, काही जण जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोपही सरनाईक यांनी केला. तुम्ही नेते मंडळी आहात, त्यामुळे हा संभ्रम दूर करण्याचे काम तुमचे आहे, असे ते म्हणाले. तसेच सर्वांचे मनापासून स्वागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शेअरिंगवर रिक्षा चालवणारे काही चालक चार प्रवासी बसवतात, या प्रश्नावर बोलताना सरनाईक यांनी सध्या मुद्दा केवळ मराठी भाषेचा असल्याचे सांगितले. हा मुद्दा घेऊन आपण पुढे जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रिक्षाचालकांविरोधात इतरही अनेक तक्रारी असल्याचे त्यांनी सांगितले. काही रिक्षाचालक जवळचे भाडे घेत नाहीत, जाणीवपूर्वक लांबचा प्रवास करतात, अरेरावीची भाषा वापरतात आणि कुठेही रिक्षा पार्क करतात, अशा अनेक तक्रारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
मात्र, सध्याचा विषय मराठी अस्मितेचा असल्याचे सरनाईक यांनी पुन्हा स्पष्ट केले. संजय निरुपम यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम केले असून त्यांना मराठी अस्मितेची अधिक जाण आहे, असे सांगत सरनाईक यांनी त्यांचे स्वागत केले.
प्रत्येकाला संधी दिली जाईल, असे सांगतानाच कोणीही बेकायदेशीररीत्या मुजोरी करत असेल आणि मराठी भाषा बोलत नसेल, तर त्यांची मुजोरी मोडून काढू, असा इशाराही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.