महाराष्ट्रावर पावसाचे संकट गडद पुढचे तीन दिवस पाऊस

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
मुंबई
maharashtra rain update गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. काही भागांत पावसाने दांडी मारली, तर काही ठिकाणी अल्प पाऊस झाला. दुसरीकडे काही भागांत अतिमुसळधार पावसामुळे शेती पाण्याखाली गेली. पावसाच्या या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाले असतानाच आता हवामान खात्याने दिलेला नवा अंदाज चिंता वाढवणारा आहे. पुढील तीन दिवस राज्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस राहण्याची शक्यता असून, त्यानंतर पावसाचे प्रमाण घटणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 

maharashtra rain update rainfall to decrease after 3 days, farmers face new crisis 
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी, तर पूर्व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने या भागासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा तसेच पूर्व विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, तीन दिवसांनंतर राज्यातील पावसाचे प्रमाण कमी होईल, अशी माहिती एसडी सानप यांनी दिली आहे.मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट ५० टक्क्यांहून अधिक असल्याचेही सानप यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात पावसाने साथ न दिल्यास या भागातील शेतीसह पाणीपुरवठ्याचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
सप्टेंबरमध्येही पावसाची चिंता
राज्यात पावसाअभावी शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. येत्या सप्टेंबर महिन्यातही राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज एसडी सानप यांनी व्यक्त केला आहे. सप्टेंबरमध्येही पावसाने ओढ दिल्यास राज्यातील अनेक भागांत पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर चारा टंचाईचाही सामना करण्याची वेळ राज्यावर येण्याची शक्यता आहे.
 
 
मासोळी धरणात केवळ १५ टक्के पाणीसाठा
अर्धा पावसाळा संपूनही अपेक्षित पाऊस न झाल्याने परभणी जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. गंगाखेड शहरासह परिसरातील अनेक गावांची तहान भागवणाऱ्या मासोळी धरणात सध्या केवळ १५ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी काळात पाऊस झाला नाही, तर या भागात मोठे जलसंकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा थेट परिणाम शेतीवरही होणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
 
 
मावळात इंद्रायणीसह भातपिकांना पोषक वातावरण
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका इंद्रायणी भाताच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. इंद्रायणी वाणासोबतच मावळमध्ये विविध प्रकारच्या भातवाणांची लागवड केली जाते. चालू खरीप हंगामात भातपिकासाठी झालेला समाधानकारक पाऊस पोषक ठरल्याने तालुक्यातील भातपिके जोमदार आली आहेत.
सध्या मावळ तालुक्यातील विविध गावांमध्ये भातपिकातील बेनणीच्या कामाला वेग आला आहे. शेतातील अनावश्यक गवत काढण्यासाठी महिला शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतात राबताना दिसत आहेत. बेनणीमुळे भातपिकाला आवश्यक अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश मिळण्यास मदत होते. त्यामुळे पिकाची वाढ चांगली होण्यास हातभार लागतो.
यंदा पावसाची साथ आणि पोषक वातावरणामुळे मावळातील भातपिकांची स्थिती समाधानकारक आहे. त्यामुळे इंद्रायणीसह इतर भातवाणांचेही उत्पादन चांगले येईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. भाताचे उत्पादन वाढल्यास खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल, असा विश्वासही शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.