मुंबई
manoj jarange patil मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या २९ ऑगस्ट रोजी निर्णायक आंदोलन करण्याची घोषणा केल्याने राज्य सरकारकडून त्यांची समजूत काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. सरकारचे एक शिष्टमंडळ आज अंतरवली सराटीत जाऊन जरांगे यांची भेट घेणार असून, त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली जाणार आहे. तसेच यापूर्वी करण्यात आलेल्या मागण्यांवर सरकारने कोणती पावले उचलली, याची माहितीही जरांगे यांना दिली जाणार आहे. या भेटीनंतर जरांगे काय भूमिका घेतात, याकडे राज्याचे लक्ष लागले असतानाच शिष्टमंडळाच्या भेटीपूर्वीच त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
मीडियाशी संवाद साधताना जरांगे यांनी, ‘‘आम्हाला किती दिवस वेड्यात काढणार?’’ असा थेट सवाल केला. सरकारचे शिष्टमंडळ आल्यानंतर ते काय म्हणतात, ते पाहू; मात्र मराठा समाजाला किती दिवस वेड्यात काढणार, याची सरकारला लाज वाटली पाहिजे, असे त्यांनी सुनावले.
प्रत्येक वेळी केवळ चर्चेला जाणे आणि वेळ मागणे सुरू आहे. गेल्या तीन वर्षांत जे जे सरकार सत्तेवर आले, त्यांच्या प्रत्येक शब्दाचा मराठा समाजाने सन्मान ठेवला. मात्र आता सरकारच्या जिव्हारी ही बाब लागली पाहिजे की मराठा समाजाला वेड्यात काढून त्याच्यावर अन्याय करता कामा नये, असे जरांगे म्हणाले. सरकारचे शिष्टमंडळ केवळ जाणूनबुजून चर्चेच्या नावाखाली वेळकाढूपणा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.वारंवार आंदोलन उभे राहिल्यानंतर मराठा समाजाला शब्द देऊन, गोड बोलून फसवता येईल, या गैरसमजातून सरकारने बाहेर पडावे, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. २८ ऑगस्टपर्यंत काय करता येईल, ते सरकारने सांगावे. आता सुट्टी नाही आणि २९ ऑगस्टचे आंदोलन थांबणार नाही. आम्ही आंदोलन करणारच आहोत, असा ठाम इशारा त्यांनी दिला.
भुजबळांवरही जरांगेंची टीका
यावेळी जरांगे यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. भुजबळ हे चतुर व्यक्ती आहेत. ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्या राज्यघटनेनुसार असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे मराठ्यांना विरोध करून आपला काही फायदा होणार नाही, अन्यथा आपले अस्तित्वच उद्ध्वस्त होईल, हे भुजबळांच्या लक्षात आल्याचे जरांगे म्हणाले.
‘सरकार आमच्या सोबत आहे म्हणून चर्चेतून मार्ग काढतोय’
दरम्यान, छगन भुजबळ यांनी काल माध्यमांशी संवाद साधताना मराठा आंदोलनावर भाष्य केले होते. मनोज जरांगे यांची लढाई आमच्या विरोधात नाही, त्यामुळे त्यावर आपण काय बोलणार, असे भुजबळ यांनी म्हटले होते. सरकार याबाबत बोलेल आणि निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.ओबीसींमध्ये किती जाती आहेत, याबाबत सरकार निर्णय घेणार असून आपण केलेल्या जातगणनेच्या मागणीवरही सरकार काम करत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले होते. जेव्हा लढायचे होते, तेव्हा मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आपण राज्यभर फिरलो. त्यामुळे छगन भुजबळ कोणाला घाबरला, असा प्रश्नच नाही. सरकार आमच्या सोबत असल्यामुळे चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे भुजबळ यांनी म्हटले होते.आता सरकारचे शिष्टमंडळ अंतरवली सराटीत पोहोचल्यानंतर चर्चेतून नेमका कोणता मार्ग निघतो आणि २९ ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगे कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.