मोरया’च्या आगमन मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप

मुंबईत तणाव, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
मुंबई
mazgaon ganpati गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील माझगाव परिसरात रविवारी रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले. ‘माझगावचा मोरया’ गणपतीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान कॉन्टिनेन्टल हाइट्स या इमारतीच्या वरच्या भागातून अंडी फेकण्यात आल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर संतप्त गणेशभक्त मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. या घटनेनंतर काही जणांनी संबंधित इमारतीच्या दिशेने दगडफेक केल्याचीही माहिती आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. दरम्यान, भायखळा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २९६ आणि १९६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
 

mazgaon ganpati procession egg throwing row: tension in mumbai, case filed against unknown person 
मिळालेल्या माहितीनुसार, ‘माझगावचा मोरया’ मंडळाच्या गणेशमूर्तीची आगमन मिरवणूक रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास लालबाग येथील गणसंकुलातून सुरू झाली. ट्रॉलीतून गणेशमूर्ती घेऊन मिरवणूक डॉ. बी. आर. आंबेडकर मार्ग, ई. एस. पाटणवाला रोडमार्गे पुढे गेली. त्यानंतर रामभाऊ भोगले मार्गावरून मिरवणूक कॉन्टिनेन्टल हाइट्सच्या सी विंगसमोरून मंडळाच्या मंडपाकडे जात होती.
रात्री सुमारे ९.४५ वाजता कॉन्टिनेन्टल हाइट्सच्या सी विंगसमोर मंडळाचे कार्यकर्ते मिरवणुकीत नाचत असताना इमारतीच्या वरच्या भागातून अज्ञात व्यक्तीने अंडे फेकल्याचा आरोप आहे. हे अंडे कार्यकर्ते नाचत असलेल्या ठिकाणी आणि श्री गणेशाच्या मूर्तीच्या दरम्यान पडल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. मंडपापासून संबंधित इमारत अवघ्या ३० ते ४० मीटर अंतरावर असल्याचेही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
या प्रकाराची माहिती पसरताच परिसरात मोठी गर्दी जमा झाली. घटनेमुळे संतप्त झालेल्या काही नागरिकांनी संबंधित इमारतीच्या दिशेने दगडफेक केल्याचे व्हिडीओही समोर आले आहेत. सुमारे चार तास परिसरातील वातावरण तणावपूर्ण राहिले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आणि अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर अखेर सकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली.
या प्रकरणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ‘माझगावचा मोरया’च्या सदस्याने दिलेल्या तक्रारीवरून भायखळा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात BNSच्या कलम २९६ आणि १९६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंडी नेमकी कोणी आणि कोणत्या ठिकाणाहून फेकली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयिताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप या प्रकरणात कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.
‘माझगावचा मोरया’ मंडळाचे mazgaon ganpati  उपसचिव विवेक राणे यांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मिरवणूक मंडपापासून ३० ते ४० मीटर अंतरावर आली असताना समोरील इमारतीतील काही समाजकंटकांनी अंडी फेकण्यास सुरुवात केल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तत्परतेने कारवाई केली; मात्र त्यानंतर जमावाकडून इमारतीवर झालेली दगडफेकही कायद्याच्या चौकटीबाहेरची प्रतिक्रिया असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी गणेशोत्सवाच्या काळात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने पुरेशी प्रतिबंधात्मक यंत्रणा उभी करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, घटनेनंतर माझगाव परिसर तसेच गणेश मंडळाच्या मंडपाबाहेर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. नागरिकांनी अफवा आणि अपुष्ट माहितीवर विश्वास ठेवू नये, तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमागील नेमके कारण आणि अंडी फेकणाऱ्या व्यक्तीची ओळख तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.