नवेगाव-नागझिराच्या जंगलात मशरूमचा ‘खजिना’!

१०० हून अधिक प्रजातींची नोंद; बुरशी जैवविविधतेच्या अभ्यासाला मिळाली चालना

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
गोंदिया
mushroom वाघ, बिबट्या, अस्वलांसह विविध वन्यजीवांसाठी प्रसिद्ध असलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात आता मशरूमचा देखील खजिना सापडला आहे. २२ व २३ ऑगस्ट रोजी झालेल्या दोन दिवसीय मशरूम व बुरशी जैवविविधता सर्वेक्षणातून जंगलातील या दुर्लक्षित जैवसंपदेचे समृद्ध वैविध्य समोर आले असून वन्यजीवांसह मशरूमच्या १०० हून अधिक प्रजाती आढळून आल्या आहेत.
 
 
mushroom
मायकोलॉजी अर्थात बुरशीशास्त्रातील सहा तज्ज्ञांसह वन विभागाचे अधिकारी व क्षेत्रीय कर्मचार्‍यांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला. व्याघ्र प्रकल्पातील विविध अधिवासांमध्ये फिरून माती, पालापाचोळा, मृत व कुजणारे लाकूड, पडलेली झाडे तसेच इतर वन परिसरात आढळणार्‍या मशरूमची पाहणी करण्यात आली. विविध प्रजातींचे निरीक्षण, छायाचित्रण आणि दस्तऐवजीकरण करण्यात आले. मशरूम म्हणजे केवळ पावसाळ्यात जंगलात दिसणारी बुरशी नव्हे, तर वन परिसंस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मृत पाने, लाकूड आणि इतर सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून पोषकद्रव्ये पुन्हा मातीत मिसळण्याचे महत्त्वाचे कार्य बुरशी करते. त्यामुळे एखाद्या जंगलातील मशरूमची विविधता ही त्या परिसंस्थेच्या आरोग्याचा महत्त्वपूर्ण संकेत मानली जाते. दरम्यान, दोन दिवसीय सर्वेक्षणात आढळलेल्या १०० हून अधिक प्रजातींची सध्या प्राथमिक नोंद करण्यात आली असून या प्रजातींची तज्ज्ञांकडून शास्त्रीय ओळख व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर या सर्वेक्षणाचा वैज्ञानिक अहवाल तयार केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या मंजूर प्रकल्पांतर्गत हे सर्वेक्षण करण्यात आले. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील बुरशी जैवविविधतेचा शास्त्रीय अभ्यास झाल्याने भविष्यात वन व्यवस्थापन आणि जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच वन अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचार्‍यांमध्ये मशरूम व बुरशीच्या विविधतेबाबत जागरूकता आणि अभ्यासाची दृष्टी निर्माण होण्यास मदत झाली.
 
 
नवेगाव-नागझिराच्या जंगलातील बुरशी जैवविविधता आतापर्यंत तुलनेने अल्पज्ञात होती. या सर्वेक्षणामुळे तिची शास्त्रीय नोंदणी करण्याचा पाया घातला गेला आहे. हा उपक्रम जैवविविधतेच्या वैज्ञानिक संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
- पियुषा जगताप, क्षेत्र संचालिका (भावसे) नवेगाव-नागझिरा