अनिल कांबळे
नागपूर,
newborn infant dumped अनैतिक संबंधातून एक अविवाहित तरुणी गर्भवती होती. तिने काही महिने असलेल्या मृत बाळाला जन्म दिला आणि ते अर्भक घराजवळील एका उकिरड्यावर फेकले. ही धक्कादायक घटना कोराडी परिसरात रविवारी समोर आली. या प्रकरणी कोराडी पोलिसांनी २२ वर्षीय तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी काही महिन्यांची गर्भवती होती. मात्र, तिने गर्भधारणेची माहिती कुटुंबीयांपासून लपवून ठेवली होती. तिचे एका तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचेही तपासात समोर आले आहे. रविवारी सकाळी तरुणी आईसोबत नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी गेली होती. फिरून दोघी घरी परतल्यानंतर काही वेळातच तरुणीच्या पोटात अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यामुळे ती बाथरूममध्ये गेली. यावेळी तिचा गर्भपात झाला आणि अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने अर्भक घराजवळून काही अंतरावर असलेल्या उकिरड्यावर फेकल्याचे पोलिस तपासात समोर आले. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर कोराडी पोलिस ठाण्याचे बीट मार्शल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्राथमिक चौकशी करून पुढील तपास सुरू केला. तपासादरम्यान प्रकरण कोराडी पोलिस ठाण्यात दाखल झाले. अर्भक योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.newborn infant dumped पोलिसांकडून आता तरुणीची चौकशी करण्यात येत असून, तिची गर्भावस्था, गर्भपाताची परिस्थिती आणि अर्भकाची विल्हेवाट लावण्यामागील नेमके कारण याबाबत तपास केला जात आहे. या घटनेशी संबंधित अन्य बाबींचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.