दुबई,
Pakistan's concerns ahead of the Asia Cup एसीसी महिला टी-२० आशिया कप सुरू होण्यास अवघा एक आठवडा बाकी असताना पाकिस्तानच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. यष्टीरक्षक-फलंदाज नाझिहा अल्वी दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाली आहे. तिच्या जागी उजव्या हाताची फलंदाज सदफ शमास हिची पाकिस्तानच्या आशिया कप संघात निवड करण्यात आली आहे.नाझिहाने डाव्या गुडघ्याच्या मागील भागात वेदना होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या स्कॅनमध्ये संभाव्य मोच असल्याचे निदर्शनास आले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या वैद्यकीय पथकाने तपासणी केल्यानंतर नाझिहाच्या पुनर्वसनाला सुरुवात होणार असून, तिच्या पुनर्वसनाचा कालावधी सुमारे चार आठवड्यांचा असण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय महिला निवड समितीने नाझिहाच्या जागी सदफ शमासला संघात स्थान दिले आहे. जानेवारी २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून सदफने पाकिस्तानकडून १२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.महिला टी-२० आशिया कप स्पर्धा २८ ऑगस्ट ते १३ सप्टेंबरदरम्यान दुबईत खेळवली जाणार आहे. पाकिस्तानचा समावेश ‘अ’ गटात असून भारत, थायलंड आणि हाँगकाँग हे त्यांचे गटातील प्रतिस्पर्धी आहेत. पाकिस्तान आपल्या मोहिमेची सुरुवात १ सप्टेंबर रोजी थायलंडविरुद्ध करणार आहे. त्यानंतर ५ सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.
महिला आशिया कप टी-२० स्वरूपात होण्याची ही सहावी वेळ आहे. मागील आवृत्तीत श्रीलंकेने अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. यंदाच्या स्पर्धेत यूएईसह भारत, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश या पाच संघांची घोषणा झाली आहे. हाँगकाँग, इंडोनेशिया आणि थायलंड या संघांची घोषणा अद्याप बाकी आहे.पाकिस्तान संघाचे नेतृत्व फातिमा सना करणार असून आयेशा जफर, इमान नसीर, आयमान फातिमा, गुल फिरोजा, मोमिना रियासत, मुनीबा अली सिद्दीकी, सदफ शमास, नशरा सुंधू, सादिया इक्बाल, सायरा जबीन, शवाल जुल्फिकार, तुबा हसन, उम्मे हसन आणि उम्मेद-ए-हस्नान यांचा संघात समावेश आहे. भारताचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे असून स्मृती मानधना उपकर्णधार आहे. भारताच्या संघात शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, भारती फुलमाली, रिचा घोष, जी कमलिनी, दीप्ती शर्मा, राधा यादव, प्रेमा रावत, अरुंधती शर्मा, रणनी शर्मा आणि श्री चरणी एन शर्मा यांचा समावेश आहे.