
१९७१ मध्ये ढाका येथे पाकिस्तानी लष्कराने केलेल्या शरणागतीचा दाखला देत ते म्हणाले, पूर्वी ताकदीचे मोठे दावे केले गेले आणि शेवटपर्यंत लढण्याचे आश्वासन दिले गेले, परंतु त्याचा परिणाम पाकिस्तानच्या पराभवात झाला. पाकिस्तानच्या विविध भागात सुरू असलेला हिंसाचार आणि सैनिकांच्या दडपशाहीमुळे पाकिस्तानचा भूगोल बदलणे अटळ आहे. पाकिस्तानचे एक नव्हे तर चार तुकडे होईल आणि यासाठी लष्करप्रमुख मुनीर हेच जबाबदार असतील. संसद आणि संघीय सरकारचे अधिकार एकाच व्यक्तीच्या हातात केंद्रित करणे देशासाठी विघातक असून, पाकिस्तानची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने सुरू आहे. परिस्थिती कायम राहिल्यास जनता विद्रोह करेल आणि परकीय शक्ती याचा फायदा घेऊन देशाचे तुकडे करण्यासाठी मदत करेल असा दावा रहमान यांनी एका कार्यक्रमात केला.
अंतर्गत परिस्थिती हाताळण्यात अपयश
रहमान यांनी लष्करी यंत्रणेच्या वारंवार होणाऱ्या शक्तीप्रदर्शनावर आणि आक्रमक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले की, देशातील सामान्य जनता गंभीर अडचणींचा सामना करत आहे आणि अशा परिस्थितीत शक्तीप्रदर्शन करून फायदा काय होणार, यामुळे देशाला अंतर्गत अशांतता आणि वाढत्या जन असंतोषापासून वाचवता येणार नाही. अंतर्गत परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेले मुनीर बाह्य शक्ती हाताळू शकणार नाही. अशा परिस्थितीत देशाचे विभाजन होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.१९७१ चे युद्ध आणि ढाक्यातील शरणागतीचा संदर्भ देत, रहमान यांनी म्हणाले, त्यावेळीसुद्धा पाकिस्तानी सैन्याने शेवटपर्यंत लढण्याचे मोठे दावे केले होते, पण जेव्हा परिस्थिती गंभीर झाली, तेव्हा त्यांना ढाक्यात शरणागती पत्करावी लागली. डिसेंबर १९७१ मध्ये १३ दिवसांच्या युद्धानंतर १६ डिसेंबर रोजी ९३,००० पाकिस्तानी सैनिकांना शरण जावे लागले. इतिहासाची पुनरावृत्ती होणारी परिस्थिती पाकिस्तानात निर्माण झाली आहे. सध्या चार प्रांत धुमसत असून, जनता विद्रोहाच्या तयारीत आहे.
पंतप्रधान शाहबाजांवर प्रश्नाची सरबत्ती
पंतप्रधाना शाहबाज देशातील लोकांना सतत कठीण परिस्थितीत का ढकलत आहे, तुम्ही देश आणि लोकांची परीक्षा का घेत आहात, तुमचे लोक दुःख भोगत असताना तुमचे मौन सुरक्षेसाठी धोकादायक आहे. संपूर्ण प्रदेश दीर्घकाळापासून संघर्ष, हिंसाचार आणि रक्तपाताचा अनुभव घेत आहे आणि याचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात. रक्तपात होतो, तेव्हा ते एका भौगोलिक बदलाचे संकेत देते. व्यवस्था एका व्यक्तीच्या हातात ठेवणे हुकूमशाहीचे धोतक असल्याचे ते म्हणाले.