कुपटा सिंचन प्रकल्पात पाणी शेती सिंचनासाठी द्या

धानोरा खु. च्या शेतकर्‍यांची जिल्हाधिकार्‍यांकडे धाव

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
मानोरा,
kupata irrigation project तालुक्यातील कुपटा येथील उपसा सिंचन प्रकल्पात सुमारे ७० टक्के पाणीसाठा उपलब्ध असूनही परिसरातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याबाबत धानोरा खुर्द येथील शेतकरी वर्गाने जिल्हाधिकारी, वाशीम यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
 
 
kupata irrigation project
 
 
निवेदनात म्हटले आहे की, शेतकर्‍यांचे सिंचनासाठी असलेले विद्युत कनेशन महावितरण विभागाने काही कारणास्तव बंद केले आहेत. प्रकल्पात मुबलक पाणी असूनही केवळ लाईट नसल्याने शेतीला पाणी देता येत नाही. सध्या खरीप पिके वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत असून, आगामी रब्बी हंगामासाठीही पाण्याची नितांत गरज आहे. वेळेवर पाणी न मिळाल्यास हजारो रुपये खर्च करून उभी केलेली पिके वाया जाण्याची आणि शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे.
शेतकर्‍यांनी आपल्या निवेदनात कळकळीची मागणी केली आहे की, सध्याच्या उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून किमान दोन महिन्यांच्या कालावधीसाठी का होईना, बंद केलेले विद्युत कनेशन तात्काळ पूर्ववत सुरू करून सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. दोन महिन्यानंतर पाणीसाठा संपल्यास किंवा पाणी उपलब्ध नसल्यास त्यानंतर कनेशन पुन्हा बंद केले तरी आमची कोणतीही हरकत राहणार नाही, अशी भूमिका शेतकर्‍यांनी घेतली आहे.kupata irrigation project यापूर्वी सहाय्यक अभियंता, लघु पाटबंधारे उपविभाग क्र. ७, कारंजा यांनाही पत्र देण्यात आले होते, मात्र कार्यवाही झाली नाही. तरी शेतकर्‍यांची अडचण लक्षात घेऊन तात्काळ विद्युत जोडणी सुरू करावी, अशी मागणी धानोरा खुर्द येथील शेतकरी वर्गाने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.