नवी दिल्ली,
Rain in Delhi delays flights दिल्ली-एनसीआरमध्ये सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनासोबतच विमानसेवेवरही मोठा परिणाम झाला. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील १४ विमानांचे मार्ग बदलण्यात आले असून, दुपारी सुमारे १:१५ वाजेपर्यंत तब्बल १५० विमानांना विलंब झाला. विमानतळावरील उड्डाणांचा सरासरी विलंब सुमारे २७ मिनिटे नोंदवण्यात आला.पावसामुळे दिल्लीकरांना दमट उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. खराब हवामानामुळे दृश्यमानता कमी होणे, धावपट्टीची स्थिती आणि हवाई वाहतूक व्यवस्थापनावर परिणाम होणे यामुळे विमानांच्या उड्डाणाच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. परिणामी अनेक उड्डाणांना विलंबाचा सामना करावा लागला.

दिल्लीहून विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विमानतळाकडे निघण्यापूर्वी संबंधित विमान कंपनीकडून उड्डाणाची स्थिती तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच पावसामुळे रस्त्यांवरील वाहतूक मंदावण्याची शक्यता लक्षात घेता नेहमीपेक्षा लवकर विमानतळावर पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मुसळधार पावसाचा फटका दिल्लीतील अनेक भागांनाही बसला. अशोक नगर मेट्रो स्टेशन, बुराडी, सी.आर. पार्क आणि अलकनंदा परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. नवी दिल्ली रेल्वे स्टेशन परिसरात आयटीओ ते अजमेरी गेटदरम्यानही वाहतूक कोंडी झाली.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दिल्लीतील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. दिवसभरात आणखी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दक्षिण-पूर्व दिल्ली, पूर्व दिल्ली, शाहदरा, मध्य दिल्ली, ईशान्य दिल्ली, दक्षिण दिल्ली, नवी दिल्ली, नैऋत्य दिल्ली, पश्चिम दिल्ली, वायव्य दिल्ली आणि उत्तर दिल्लीच्या काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. यावेळी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.