बोल्टचा १७ वर्षे जुना वेगाचा विक्रम रोबोटने मोडला

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
मुंबई
robot beats  जमैकाचा महान धावपटू उसैन बोल्टने २००९ मध्ये १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत नोंदवलेला ९.५८ सेकंदांचा विश्वविक्रम आजही मानवी धावपटूंसाठी अबाधित आहे. मात्र, चीनमध्ये सुरू असलेल्या ‘वर्ल्ड ह्युमनॉइड रोबोट गेम्स’मध्ये एका रोबोटने १०० मीटरचे अंतर अवघ्या ९.३९ सेकंदांत पूर्ण करत बोल्टच्या वेळेलाही मागे टाकले आहे. त्यामुळे वेगाच्या बाबतीत रोबोट्स आता माणसांना आव्हान देत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
 

robot beats   
चीनची राजधानी बीजिंग येथे शनिवार, २२ ऑगस्टपासून ‘वर्ल्ड ह्युमनॉइड रोबोट गेम्स’च्या दुसऱ्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत चीनच्या सिंघुआ विद्यापीठाच्या तियानझुओ (Tianzhuo) टीमने तयार केलेल्या Tiangong ultra या रोबोटने १०० मीटरची शर्यत ९.३९ सेकंदांत पूर्ण केली. उसैन बोल्टने ऑगस्ट २००९ मध्ये बर्लिन येथे झालेल्या ‘वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप’मध्ये ९.५८ सेकंदांची वेळ नोंदवत विश्वविक्रम केला होता. बोल्टचा मानवी धावपटू म्हणून असलेला विश्वविक्रम अद्याप कायम असला, तरी रोबोटने नोंदवलेली वेळ त्यापेक्षा कमी आहे.
विशेष म्हणजे, गेल्या वर्षी झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या हंगामात १०० मीटरसाठी रोबोटने नोंदवलेली सर्वोत्तम वेळ २१.५० सेकंद होती. अवघ्या एका वर्षात तंत्रज्ञानात झालेल्या वेगवान प्रगतीमुळे ही वेळ निम्म्याहूनही कमी झाली आहे. त्यामुळे भविष्यात रोबोट्सच्या वेगात आणखी किती सुधारणा होते आणि त्यांचे कोणते नवे विक्रम प्रस्थापित होतात, याकडे आता क्रीडा आणि तंत्रज्ञान क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
 
 
ऑलिम्पिकमध्ये तब्बल आठ पदके जिंकणारा उसैन बोल्ट जगातील सर्वात वेगवान धावपटू म्हणून ओळखला जातो. बर्लिनमधील २००९च्या वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने १०० मीटरचे अंतर ९.५८ सेकंदांत पूर्ण केले होते. त्यानंतर अनेक धावपटूंनी त्याचा विक्रम मोडण्याचा प्रयत्न केला; मात्र आजतागायत कोणत्याही मानवी धावपटूला त्याच्या वेळेची बरोबरी करता आलेली नाही.रोबोट्सने केवळ धावण्याच्या शर्यतीतच नव्हे, तर उंच उडीतही माणसांना मागे टाकल्याचे या स्पर्धेत दिसून आले. तिएनकुंग (Tienkung) नावाच्या रोबोटने २.८८ मीटर उंच उडी मारली. मानवाचा उंच उडीचा विक्रम २.४५ मीटर इतका आहे. त्यामुळे वेग, ताकद आणि शारीरिक क्षमतेच्या विविध क्षेत्रांत रोबोट्सची कामगिरी झपाट्याने सुधारत असल्याचे चित्र आहे.वेगाने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानामुळे रोबोट्सचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग आता केवळ प्रात्यक्षिकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. मानवी क्षमतेला थेट आव्हान देणारी कामगिरी ते करू लागले आहेत. आगामी काळात हे रोबोट्स आणखी कोणते विक्रम आपल्या नावावर करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.