मुंबई,
second installment of farm loan waiver राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाला मंजुरी देण्यात आली. या टप्प्यात ६ लाख ३६ हजार ३६ पात्र शेतकऱ्यांना ५,०८६ कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.यापूर्वी ७ ऑगस्ट रोजी योजनेच्या पहिल्या टप्प्यात ५,०२९ कोटी रुपये वितरित करण्यात आले होते. त्यावेळी ६ लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता. आता दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणामुळे दोन टप्प्यांत मिळून १२ लाख ५८ हजार २४३ शेतकऱ्यांना १०,११५ कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.

राज्य सरकारकडून ही कर्जमाफी टप्प्याटप्प्याने राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील ३२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार असून, २३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. एकूण ५६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.महायुती सरकारने विधानसभा नवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर विविध शेतकरी संघटनांकडून कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आले. सरकारने ३० जूनपर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर अखेर कर्जमाफीची योजना जाहीर करण्यात आली. सुरुवातीला २०१९च्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाबाबत काही मर्यादा निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र, नंतर या निर्णयात बदल करून अशा शेतकऱ्यांचेही २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या योजनेसाठी राज्य सरकारला अंदाजे ४०,९८० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पात्र शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीचा लाभ पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू असून लाभार्थींची संख्या वेळोवेळी अद्ययावत केली जात आहे. योजनेची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जात असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कर्जमाफीच्या यादीत नाव असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी या दोन्ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.