‘कुठेही असाल, नजर ठेवून आहोत!

काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसरे पत्र

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
श्रीनगर,
Second letter to Kashmiri Pandits काश्मिरी पंडितांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. युनायटेड लिबरेशन फ्रंट (ULC) या संघटनेच्या नावाने जारी करण्यात आलेले धमकीचे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या १५ दिवसांतील ही दुसरी धमकी असल्याने काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.२३ ऑगस्ट २०२६ रोजीच्या या पत्रात विस्थापित काश्मिरी पंडित कुटुंबांची नावे आणि पत्ते नमूद करण्यात आल्याचा दावा आहे. संबंधित व्यक्तींवर पाळत ठेवली जात असल्याचे सांगत त्यांना लक्ष्य करण्याची भाषा या पत्रात करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आरएसएसशी संबंधित अजेंडा पुढे नेणाऱ्या व्यक्तींनाही धमकी देण्यात आल्याचे त्यातून समोर आले आहे.
 
 
 
df4654
 
यापूर्वी ७ ऑगस्ट २०२६ रोजीही ULCच्या नावाने अशाच स्वरूपाचे पत्र प्रसारित झाले होते. त्यामध्ये सहा काश्मिरी पंडित सरकारी कर्मचाऱ्यांची नावे आणि फोन नंबर देण्यात आले होते. यातील अनेक कर्मचारी ‘पंतप्रधान पॅकेज’अंतर्गत कार्यरत असल्याचे सांगण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबीयांची, कामाच्या ठिकाणाची आणि सध्याच्या ठिकाणाची माहिती आपल्याकडे असल्याचा दावा त्या पत्रात करण्यात आला होता.भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, युनायटेड लिबरेशन कौन्सिल किंवा ULC ही पाकिस्तानस्थित लश्कर-ए-तोयबा (LeT) ची आघाडीची संघटना मानली जाते. या संघटनेचे नाव यापूर्वी जुलैमध्येही चर्चेत आले होते. हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानीच्या पुण्यतिथीनिमित्त ULCच्या नावाने एक पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले होते.
 
 
दरम्यान, नव्या धमकीच्या पार्श्वभूमीवर पनुन काश्मीरसह विविध काश्मिरी पंडित संघटनांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. धमकी पत्रांमधील व्यक्तींचे सखोल धोकामूल्यांकन करून त्यांना दीर्घकालीन आणि मजबूत सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी करण्यात आली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख डॉ. फारूक अब्दुल्ला यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.सुरक्षा यंत्रणांनी धमकीच्या पत्रांची सत्यता तपासण्यास सुरुवात केली असून, ती नेमकी कुठून प्रसारित झाली आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाशी संबंधित काही सोशल मीडिया चॅनेल ब्लॉक करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, धमकीच्या पत्रांच्या उगमाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. काश्मिरी पंडितांच्या मायदेशी परतण्यास आणि पुनर्वसनासंदर्भातील सरकारी प्रयत्नांना वेग मिळत असतानाच या नव्या धमक्या समोर आल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.