ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते

शिवसेना प्रकरणावर असीम सरोदेंचा मोठा दावा

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
मुंबई
shiv sena शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह नेमके कोणाचे, यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणातील गेल्या काही सुनावण्यांमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. मात्र, अद्याप शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद बाकी आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी मोठे विधान करत उद्धव ठाकरे यांना ‘अन्यायग्रस्त राजकीय नेते’ असे संबोधले आहे.
 
 

shiv sena name and symbol case asim sarode backs uddhav thackeray, supreme court hearing 
शिवसेना प्रकरणाची सुनावणी वेगाने सुरू असून निवडणूक आयोग, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांनी संविधानासोबत बदमाशी केल्याचा गंभीर आरोप सरोदे यांनी केला. कायदेशीर सत्य उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असतानाही त्यांच्याबाबत असत्याचीच भूमिका घेतल्यासारखी वागणूक देण्यात आली, असे त्यांनी म्हटले.उद्धव ठाकरे यांची बाजू जणू काही असत्यच आहे, अशा पद्धतीने त्यांच्याशी वागणूक देण्यात आली. त्यामुळे आपल्याला उद्धव ठाकरे हे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, असे सरोदे म्हणाले. केवळ राजकीय पक्षातील नेत्यांच्या झुंडीनेच त्यांच्यावर अन्याय केला नाही, तर राज्यपाल, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनीदेखील त्यांच्यावर अन्याय केला असल्याचा दावा त्यांनी केला.
 
 
सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणाला मोठा विलंब झाला असून, हा विलंबदेखील अन्यायाचाच एक भाग असल्याचे सरोदे यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांची बाजू योग्य असतानाही त्यांना इतकी वर्षे कोणताही न्याय मिळालेला नाही. त्यामुळेच आपण त्यांना अन्यायग्रस्त राजकीय नेता मानत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली आणि शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गट अशी पक्षाची विभागणी झाली. त्यानंतर शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके कोणाला द्यायचे, असा प्रश्न निवडणूक आयोगासमोर निर्माण झाला.विधिमंडळ पक्षातील संख्याबळाचा आधार घेत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. या निर्णयाला शिवसेना ठाकरे गटाने न्यायालयात आव्हान दिले असून, त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत. आता शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद बाकी असून, पुढील सुनावणीत या प्रकरणाला कोणते वळण मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.