पीएमपी बसमधून पडलेल्या विद्यार्थिनीचा स्कूल बसच्या चाकाखाली मृत्यू

सिंहगड रस्त्यावरील वूड प्लाझासमोर दुर्घटना;

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
पुणे,
student accident उच्च शिक्षण घेऊन सेमीकंडक्टर चिप डिझाइनच्या क्षेत्रात संशोधन करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्था (डीआयएटी) येथील एमटेकच्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थिनीचा सोमवारी अपघातात मृत्यू झाला. पीएमपी बसमधून खाली पडलेली विद्यार्थिनी त्याचवेळी बाजूने जाणाऱ्या स्कूल बसच्या चाकाखाली आल्याने मृत्यू झाला.
 

student accident 
 
 
कांचन बळवंत खड्डा (वय २५) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. या प्रकरणी पीएमपी बसचालक आणि स्कूल बसचालकाविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोन्ही चालकांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले असून, अपघाताची नेमकी कारणे शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचन खड्डा ही मूळची राजस्थानमधील हनुमानगड येथील रहिवासी होती. तिने भारतीय तंत्रज्ञान संस्था, बनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयू), वाराणसी येथून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी तिने खडकवासला येथील संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्था अर्थात डीआयएटीमध्ये प्रवेश घेतला होता.कांचन सध्या एमटेकच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. ती सेमीकंडक्टर चिप डिझाइन या महत्त्वपूर्ण आणि अत्याधुनिक विषयात विशेष शिक्षण घेत होती. या क्षेत्रात संशोधन करून पीएच.डी. करण्याचे तिचे ध्येय होते. त्यासाठी तिने आतापासूनच तयारी सुरू केली होती.
कांचन ही डीआयएटीच्या खडकवासला परिसरातील कॅम्पसमध्ये असलेल्या कृष्णा हॉस्टेलमध्ये राहत होती. सोमवारी दिघी येथील डीआरडी लॅबमध्ये प्रात्यक्षिक असल्याने ती सकाळी खडकवासला येथून पीएमपी बसने निघाली होती. सिंहगड रस्त्यावरून प्रवास करीत असताना सकाळी सुमारे ९ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास हा अपघात घडला.सिंहगड रस्त्यावरील वूड प्लाझा दुकानासमोर बस आल्यानंतर कांचन बसच्या पुढील दरवाजातून बस मध्ये गर्दी असल्याने खाली पडली.student accident ती रस्त्यावर पडताच त्याचवेळी बाजूने जाणाऱ्या एका स्कूल बसच्या चाकाखाली आली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. गंभीर जखमी अवस्थेतील कांचनला तातडीने जगताप रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
सिंहगड रस्ता पोलिसांनी दोन्ही बसचालकांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले. प्रकरणाचा पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस करीत आहेत.