मुंबई,
Tall Ganesh idols pose a deadly risk मुंबईतील भुलेश्वर राजा गणेश मंडळाच्या आगमन मिरवणुकीदरम्यान शनिवारी २२ फुटांची गणेशमूर्ती कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मुंबईतील गणेश मंडळांमध्ये वाढत असलेल्या मूर्तींच्या उंचीच्या स्पर्धेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. शहरातील काही मंडळांकडून ३० ते ४० फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जात असल्याने अशा भव्य मूर्तींच्या आगमन आणि विसर्जनावेळी सुरक्षिततेचे मोठे आव्हान निर्माण होत आहे.खेतवाडी, लालबाग आणि परळ परिसरातील अनेक प्रसिद्ध गणेश मंडळांमध्ये २० ते ३० फुटांपर्यंतच्या, तर काही ठिकाणी ४० फुटांपर्यंतच्या मूर्ती पाहायला मिळतात. उंच मूर्तींमुळे भाविकांचे आकर्षण वाढत असले तरी त्यांची मिरवणूक काढताना मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ, अनुभवी कार्यकर्ते आणि विशेष नियोजनाची आवश्यकता असते. विसर्जनाच्या वेळीही प्रशासन आणि गणेश मंडळांना अतिरिक्त खबरदारी घ्यावी लागते.

यापूर्वी २००४ मध्ये गणेशोत्सव समन्वय समितीने गणेशमूर्तीची कमाल उंची १८ फुटांपर्यंत ठेवण्याचा निर्णय घेतला होता. काही मंडळांनी २२ फुटांपर्यंत मूर्तीची मागणी केली होती; मात्र समितीने १८ फुटांची मर्यादा निश्चित केली. सुरुवातीची दोन ते तीन वर्षे या निर्णयाचे पालन झाले. त्यानंतर काही मंडळांनी पुन्हा २२ फुटांपर्यंतच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यास सुरुवात केली. पुढील काळात ही उंची ३० फुटांपर्यंत आणि अलीकडे ४० फुटांपर्यंत पोहोचल्याचे दिसून येते.मोठ्या मूर्तींच्या आकर्षणामागे भाविकांची पसंती तसेच गणेश मंडळांचे अर्थकारणही महत्त्वाचे कारण मानले जाते. मात्र, २० फुटांपेक्षा अधिक उंच मूर्ती उभारल्यानंतर त्यांच्या वाहतुकीपासून मिरवणुकीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर विशेष नियोजन आवश्यक असल्याचे अनुभवी मंडळांचे म्हणणे आहे.
मुंबईत यापूर्वीही उंच गणेशमूर्ती कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अंधेरीतील प्रसिद्ध गणेश मंडळाची मूर्ती समुद्रात कलंडल्याची घटना घडली होती. लालबाग गणेश टॉकीजजवळही गणेशमूर्ती कोसळली होती. २००८ मध्ये गिरगावच्या महाराजाची मूर्ती चौपाटीवर पडली होती. या घटनेत चार जण जखमी झाले होते. भुलेश्वरमधील ताज्या दुर्घटनेमुळे उंच गणेशमूर्तींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आगमन आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान आवश्यक मनुष्यबळ, अनुभवी कार्यकर्ते आणि योग्य सुरक्षा व्यवस्था असणे महत्त्वाचे आहे. मात्र, अशा दुर्घटना कायमस्वरूपी टाळायच्या असतील तर गणेशमूर्तींच्या उंचीबाबत ठोस नियम आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.