सुवर्णसंधी.... महापालिकेत ७०८ पदांसाठी भरती

२४ हजार अर्ज, १ आणि २ सप्टेंबरला लेखी परीक्षा

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
ठाणे
thane municipal corporation ठाणे महापालिकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली असून, विविध संवर्गातील ७०८ रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला आता वेग आला आहे. चालक, फायरमन आणि कनिष्ठ अभियंत्यांसह विविध पदांसाठी महापालिकेकडून भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, ७०८ पदांसाठी तब्बल २४ हजार बेरोजगार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या पदांसाठी येत्या १ आणि २ सप्टेंबरदरम्यान लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे लक्ष आता परीक्षेकडे लागले आहे.
 

thane municipal corporation recruitment 2025: 708 posts, 24,000 applications, exam on september 1-2 
ठाणे महापालिका ही मुंबई उपनगरातील महत्त्वाची महापालिका असून, येथे नोकरीची संधी मिळावी यासाठी मोठ्या संख्येने तरुणांनी अर्ज केले आहेत. महापालिकेने १० ऑगस्ट २०२५ रोजी गट ‘क’ आणि गट ‘ड’मधील विविध रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, फायरमन पदांच्या आरक्षणामध्ये शासनाच्या निर्णयानुसार आवश्यक तरतूद करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास आले.
यानंतर महापालिकेने नवे पत्रक काढून फायरमन पदांच्या आरक्षणात सुधारणा केली आहे. शासनाच्या ५ फेब्रुवारी २००८ रोजीच्या निर्णयानुसार, किमान तीन वर्षे सेवा केलेल्या होमगार्ड जवानांसाठी फायरमन संवर्गात पाच टक्के समांतर आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यानुसार फायरमनच्या एकूण ३८१ पदांपैकी १९ पदे होमगार्ड उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
ठाणे महापालिकेतील या thane municipal corporation  भरतीमध्ये फायरमन अर्थात अग्निशामक पदाच्या ३८१ जागा असून, चालक-यंत्रचालकाची २०७ पदे आहेत. सहाय्यक फायरमनच्या १३ जागा भरल्या जाणार आहेत. कनिष्ठ अभियंता (नागरी) पदासाठी २४, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) पदासाठी १६ आणि कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदासाठी ४ जागा उपलब्ध आहेत. तसेच कनिष्ठ अभियंता किंवा स्थळ पर्यवेक्षक पदाच्या ६३ जागांसाठीही भरती केली जाणार आहे.
या सर्व पदांसाठी २४ हजार अर्ज प्राप्त झाल्याने स्पर्धा मोठी असणार आहे. १ आणि २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेत उमेदवारांच्या तयारीची कसोटी लागणार असून, ठाणे महापालिकेतील या भरतीतून नोकरी मिळवण्यासाठी हजारो तरुण आता परीक्षेच्या तयारीला लागले आहेत.