अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

सहा जणांची प्रकृती गंभीर

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
अमरावती, २४ ऑगस्ट
Three newborns die of burns in Amravati जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर असलेल्या नवजात शिशु कक्षाला सोमवारी पहाटे ४ वाजता आग लागून तीन नवजात बालकांचा होळपळून मृत्यू झाला. सहा बालक गंभीर जखमी आहेत.रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयात नवजात बालकांवर उपचार करण्यासाठी प्रत्येकी १३ खाटांचे ३ अतिदक्षात कक्ष आहेत. हे तिन्ही कक्ष एकमेकाला लागून आहेत. एकूण ३९ बालकांना याठिकाणी ठेवण्याची व्यवस्था आहे. यातील एका कक्षाला आग लागली त्यावेळी त्या कक्षात ९ बालक उपचार घेत होते.
 
 
 
g676
 
आग लागल्या बरोबर व्हेंटिलेटर मधून धूर निघाला. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर व परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी बालकांना बाहेर काढले. तापसाणी केल्यावर तिघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. जखमी ६ बालकांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एक बालक अत्यावस्थ आहे. अन्य दोन कक्षातील बालक सुखरूप आहेत, त्यांना सुरक्षेच्या कारणावरून आणि पुढील उपचारासाठी पीडीएमसीत हलविण्यात आले, असल्याचे जिल्हा स्त्री रुग्णालयाचे प्रमुख डॉ. विनोद पवार यांनी सांगितले. या घटनेने माहिती मिळताच अग्निशमन विभाग, पोलिस व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. आवश्यक चौकशीसाठी पोलिसांनी कक्षाचा ताबा घेतला असून तो जाळून खाक झाला आहे. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे.
 
 
इमारत, उपकरणे, वायरिंग नवीन
जिल्हा स्त्री रुग्णालयाची इमारत नवीन आहे. येथील वायरिंग, उपकरणे व अन्य साहित्य नवीन आहे. एक वर्षापूर्वीच या इमारतीतून कामकाज सुरू झाले. सर्व काही नवीन असताना ही घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. झालेल्या कामात काही दोष होते का? किंवा मेन्टेनन्सकडे दुर्लक्ष झाले का? असे प्रश्न उपस्थित होत आहे. घटनेची सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे.
 
 
उच्चस्तरीय चौकशीचे आदेश : बावनकुळे
अमरावतीमधील आजच्या दुर्घटनेमुळे मी खूप दुःखी आहे. दगावलेल्या नवजात बालकांना अतिशय व्यथित अंतःकरणाने श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या पालकांना हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर देवो, अशी प्रार्थना करतो. या घटनेच्या संपूर्ण चौकशीचे आदेश मी दिले आहेत. जे जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना सर्व प्रकारची वैद्यकीय सहायता दिली जात आहे. मृत बालकांच्या नातेवाईकांच्या पाठीशी सरकार उभे असून, सरकार व प्रशासन संपूर्ण मदत करत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात असून, आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या आहेत. प्रशासन पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. आगीचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
 
काँग्रेसचे फायर ऑडिटवर प्रश्नचिन्ह
घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख यांच्यासह अन्य काँग्रेसचे नेते रुग्णालयात पोहोचले. त्यांनी आग लागलेल्या अतिदक्षता कक्षाची पाहणी केली. संबंधित जबाबदार व्यक्तींची संवाद साधला. रुग्णालयाच्या फायर ऑडिटवर त्यांनी आक्षेप घेतला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून फायर ऑडिट आणि अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबत वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली.
तीन वर्षानंतर पुनरावृत्ती
जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या जुन्या इमारती तीन वर्षांपूर्वी नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात अशीच आग लागल्याची घटना घडली होती. त्यातही काही बालकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरच नवीन इमारत उभारण्याचा निर्णय झाला. आज तीन वर्षानंतर नव्या इमारतीतही तशीच घटना घडून पुनरावृत्ती झाली आहे.

कठोर कारवाई करा : राणा
जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मुख्यमंत्र्यांनी आवश्यक तो निधी तातडीने देऊन ही इमारत उभी झाली. येथे सर्व अत्याधुनिक सुविधा असतानाही अशी घटना होणे म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांचे व्यवस्थेकडे अजिबात लक्ष नव्हते असा त्याचा अर्थ होतो. वेळोवेळी आढावा घेताना कोणी त्रुटी असल्याचे सांगितले नाही. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली.