अस्वस्थता की आश्वस्तता?
editorial सामाजिक प्रश्नांच्या बुरख्याआडून गेल्या काही दिवसांत देशात जे काही राजकारण उफाळलेले आहे, त्यामुळे समाजास भविष्यातील वाटचालीची नेमकी दिशा मिळणार की कोणत्या दिशेने जावे याबाबतचा संभ्रम माजणार हा नवा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता संभवते. कारण, समाजव्यवस्थेची एक घडी असते. जगभरातील कोणत्याही देशात समाजजीवनाने ती घडी जपण्याचाच प्रयत्न केलेला दिसतो. इतिहासाकडे वळून पाहिल्यास, ही घडी विस्कटत चालल्याची जाणीव होऊ लागली की समाज अस्वस्थच होतो असे दिसते. अर्थात, समाजजीवनाची पूर्वापार चौकट आहे तशीच रहावी अशी कोणत्याच समाजाची कधीच इच्छा नसते. उलट, काळासोबत समोर येणाऱ्या नव्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी गरजेनुसार जे बदल आणि ज्या सुधारणा स्वीकाराव्या लागतात, त्यांचे स्वागतच झालेले जगभरातील समाजव्यवस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतल्यास पाहावयास मिळते. मात्र, बदलांच्या वेगवान प्रवाहासोबत बेबंदपणे वाहवत जाण्याचा अविवेकीपणा केल्यास अनेक संस्कृती रसातळाला गेल्याची उदाहरणेदेखील पाहावयास मिळतात. या परिस्थितीमुळे प्रश्नांची जुनी मालिका नव्या ताकदीने उभी केली असली, तरी उत्तर देण्याची जबाबदारी मात्र परिस्थितीने स्वीकारलेली नाही. ही उत्तरे शोधण्यासाठी समाज केवळ प्रश्न विचारत राहिला, तर उत्तरदायित्वाची सामाजिक भावना कायम राहील का, हा प्रश्नदेखील याच परिस्थितीमुळे उभा राहण्याची शक्यता असून, त्याला राजकीय उद्दिष्टांचे धक्के बसत गेले तर त्याचे परिणाम कसे असतील याचा विवेकी विचार करण्याची वेळदेखील याच परिस्थितीने आणली आहे.
दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या पुणे शहरात लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात सामाजिक चौकटीच्या परंपरागत शिस्तीवरच प्रश्न उपस्थित केले. महिलांचे स्वातंत्र्य, समानता, सामाजिक रूढी, अशा अनेक संदर्भांवर त्यांनी उपस्थित तरुणांना बोलते केले आणि राजकीय मंचावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून पक्षाला राजकीयदृष्ट्या अपेक्षित असलेली उत्तरे मिळवून समाजव्यवस्थेसमोर प्रश्नांचा डोंगर उभा केला. हा कार्यक्रम राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न होता असे भासविले जात असले, तरी ते पूर्णपणे खरे नाही, हे राहुल गांधी यांनी कार्यक्रमादरम्यान दाखविलेल्या वा उद्धृत केलेल्या काही विधानांवरून स्पष्ट होते.
काँग्रेसने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास त्याआधी दिल्लीत घडलेल्या तरुणांच्या आंदोलनाने केंद्रस्थानी आणलेल्या प्रश्नांची पुरवणी होती, हे स्पष्ट आहे. कॉक्रोच जनता पार्टी नावाच्या नव्याने स्थापन झालेल्या व भविष्याची नेमकी दिशा ठावूकच नसलेल्या प्रवाहाकडे वळू पाहणारा तरुणाईचा ओढा आवरला नाही, तर मतदार म्हणून राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणारा हा वर्ग पुन्हा प्रस्थापित राजकारणाकडे वळविता येणार नाही, ही भीती त्या आंदोलनाने मुख्यतः काँग्रेससमोर उभी केली होती हेही स्पष्ट आहे. त्यामुळेच, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावेळी काहीशी अलिप्त भूमिका घेणाèया राहुल गांधी व काँग्रेसने त्या आंदोलनाची धग ओसरताच तेच मुद्दे हाती घेऊन तरुणाईला आकर्षित करण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला आणि ‘छात्रों की गूंज’ नावाने काही क्रांतिकारी वळण देण्याचा प्रयत्न सुरू केला यात शंका नाही. तथापि, यामुळे आता समाजाला काही प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत. परंपरा आहे म्हणून परंपरेने सांगितलेले सारेच योग्य ही भूमिका समाजाने याआधीही कधीच स्वीकारलेली नाही. उलट, परंपरा लवचीक असून त्यामध्ये नवतेची भर घालण्यासाठी भारतीय समाज सदैव तयारच राहिला. कारण, परंपरा झुगारून दिल्या पाहिजेत किंवा जुने ते सारे नष्ट करून टाकले पाहिजे या दोन्ही भूमिका टोकाच्या आहेत, याची भारतीय समाजास सतत जाणीव होती. राहुल गांधींनी प्रस्थापित सामाजिक चौकट