यशच्या ‘टॉक्सिक’च्या प्रमोशनल कार्यक्रमात दुर्घटना

साउंड सेटअप कोसळल्याने दोघे जखमी

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
मुंबई
yash toxic दाक्षिणात्य सुपरस्टार यश सध्या आगामी ‘टॉक्सिक’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी नुकताच हैदराबाद येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमादरम्यान साउंड सेटअपचा भाग कोसळल्याने दुर्घटना घडली असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 

yash toxic pre-release event accident: two injured after sound setup collapses in hyderabad 
हैदराबादमधील मल्ला रेड्डी विद्यापीठात यशच्या ‘टॉक्सिक’चा प्री-रिलीज कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमासाठी हजारो चाहत्यांची गर्दी झाली होती. गर्दी वाढल्यानंतर पोलिसांकडून उपस्थितांना वारंवार मागे सरकण्याची विनंती करण्यात येत होती. मात्र, त्यानंतरही अनेक जण स्टेजच्या दिशेने पुढे सरकत होते. याचदरम्यान कार्यक्रमस्थळी काही तरुण विविध संरचनांवर चढताना दिसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
काही तरुण साउंड बॉक्सला आधार देणाऱ्या खांबावर चढले होते. त्याचवेळी ही संरचना अचानक कोसळली आणि त्याखाली दोघे जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्घटना घडताच कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला. त्यावेळी यश स्टेजवर भाषण करत होता. साउंड सिस्टम कोसळल्यानंतर साउंड आणि लाईट बंद झाले, तसेच लाईटचा एक भागही खराब झाला.
घटनेची माहिती मिळताच यशने तातडीने आपले भाषण थांबवले. त्याने उपस्थितांची विचारपूस करत, “अरे सगळ्यांनी सांभाळून… त्या ठिकाणी सर्वकाही ठीक आहे? सगळे सुरक्षित तर आहेत ना?” असे विचारले. काही वेळानंतर त्याने अधिकाऱ्यांकडून नेमके काय घडले याची माहिती घेतली आणि जखमींकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती केली.
जखमी झालेल्या दोन्ही व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आयोजकांकडून कळवल्यानंतर यशने पुन्हा आपले भाषण सुरू केले. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, यशच्या ‘टॉक्सिक’ yash toxic या बहुप्रतीक्षित सिनेमाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. २६ ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित या सिनेमात किआरा अडवाणी आणि नयनतारा या अभिनेत्री प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. प्रदर्शनापूर्वीच सिनेमाची जोरदार चर्चा सुरू असून यशच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.