१० वर्षांत डिजिटल पेमेंटची क्रांती!

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
digital payment revolution in 10 years भारताच्या डिजिटल पेमेंट व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणणाऱ्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआयला आज १० वर्षे पूर्ण झाली. २५ ऑगस्ट २०१६ रोजी सुरू झालेली ही सेवा आता देशातील दैनंदिन आर्थिक व्यवहारांचा महत्त्वाचा भाग बनली आहे. छोट्या दुकानातील काही रुपयांच्या पेमेंटपासून मोठ्या व्यावसायिक व्यवहारांपर्यंत पैसे पाठवणे आणि स्वीकारणे यूपीआयमुळे अधिक सोपे झाले आहे. या दशकपूर्तीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर विशेष पोस्ट करत यूपीआयच्या प्रवासाचे कौतुक केले.
 
digital payment revolution in 10 years
 
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, दहा वर्षांपूर्वी यूपीआयची सुरुवात झाल्याने भारताच्या डिजिटल पेमेंट क्षेत्रात मोठे परिवर्तन घडले. यूपीआयने देशातील डिजिटल व्यवहारांची व्याप्ती वाढवली असून त्याची झालेली व्यापक पोहोच ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, यूपीआयच्या सुरुवातीच्या काळात म्हणजेच २०१६-१७ या आर्थिक वर्षात वार्षिक सुमारे १७.८ दशलक्ष म्हणजेच १.७८ कोटी व्यवहार झाले होते. त्यानंतर या प्रणालीचा वेगाने विस्तार झाला. २०२५-२६ या आर्थिक वर्षात वार्षिक यूपीआय व्यवहारांची संख्या २४,१६२ कोटींपेक्षा अधिक झाली. म्हणजेच सुमारे दहा वर्षांच्या कालावधीत व्यवहारांच्या संख्येत अंदाजे १३,००० पटींनी वाढ झाली. यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांच्या मूल्यामध्येही मोठी वाढ झाली आहे. २०१६-१७ मध्ये यूपीआयने सुमारे ₹०.०७ लाख कोटींचे व्यवहार हाताळले होते. २०२५-२६ मध्ये ही रक्कम वाढून अंदाजे ₹३१४ लाख कोटींवर पोहोचली.
 
यूपीआयच्या वाढत्या वापराचा परिणाम मासिक व्यवहारांच्या आकडेवारीतही दिसून येतो. मे २०२६ मध्ये प्रथमच एका महिन्यात २.३ अब्जांपेक्षा अधिक व्यवहार झाले. मे महिन्यात २.३२ अब्ज व्यवहारांची नोंद झाली, तर जुलै २०२६ मध्ये २,३६६ कोटी व्यवहार झाले. हे यूपीआयच्या दशकभराच्या प्रवासातील सर्वाधिक मासिक व्यवहारांचे आकडे ठरले आहेत.
 
यूपीआयशी जोडल्या गेलेल्या बँकांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. २०१६-१७ मध्ये केवळ ४४ बँका यूपीआय नेटवर्कशी जोडलेल्या होत्या. २०२५-२६ या आर्थिक वर्षापर्यंत ही संख्या वाढून ७०३ बँकांवर पोहोचली. भारतापुरती मर्यादित न राहता यूपीआयची व्याप्ती आता परदेशातही वाढली आहे. यूएई, फ्रान्स, भूतान, श्रीलंका, नेपाळ, सिंगापूर, मॉरिशस, कतार, कंबोडिया, ग्रीस आणि मालदीव अशा ११ देशांमध्ये यूपीआय कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफच्या माहितीनुसार, २०२५ मध्ये जगभरातील रिअल-टाइम पेमेंट व्यवहारांच्या एकूण संख्येत यूपीआयचा वाटा अंदाजे ४९ टक्के असेल.
 
दहा वर्षांच्या कालावधीत यूपीआयने भारतातील डिजिटल पेमेंटची पद्धत मोठ्या प्रमाणात बदलली आहे. व्यवहारांची संख्या, व्यवहारांचे मूल्य, सहभागी बँका आणि आंतरराष्ट्रीय विस्तार या सर्वच बाबतीत झालेली वाढ यूपीआयच्या व्यापक स्वीकाराचे चित्र स्पष्ट करते. त्यामुळे भारताची डिजिटल ओळख मजबूत करण्यासोबतच यूपीआयने जगातील आघाडीच्या रिअल-टाइम पेमेंट प्रणालींपैकी एक म्हणूनही स्थान निर्माण केले आहे.