मुंबई
arjun bijlani टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीच्या कारला नुकताच अपघात झाल्याची बातमी समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातानंतर अर्जुनच्या प्रकृतीबाबत विविध चर्चा सुरू झाल्या. मात्र, आता स्वतः अर्जुनने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपल्या प्रकृतीची माहिती दिली असून, आपण पूर्णपणे ठीक असल्याचे स्पष्ट केले आहे. हा अपघात गंभीर नसल्याचेही त्याने सांगितले आहे.
अर्जुनच्या कारला ‘इंडियन गेम शो’च्या सेटवरून घरी परतत असताना अपघात झाला. या घटनेनंतर त्याचे मित्र, कुटुंबीय आणि चाहते चिंतेत पडले. त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेकांनी फोन आणि मेसेज केले. त्यानंतर अर्जुनने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून सर्वांना परिस्थिती स्पष्ट केली.
व्हिडीओमध्ये अर्जुनने आपण अगदी ठीक असल्याचे सांगितले. अपघाताबद्दल माहिती देताना त्याने सांगितले की, हा अतिशय किरकोळ अपघात होता. कारला दुरुस्तीची गरज आहे, मात्र आपल्या प्रकृतीबाबत कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. कारचा विमा असल्याचेही त्याने स्पष्ट केले. तसेच प्रकृतीची चौकशी करण्यासाठी फोन आणि मेसेज करणाऱ्या मित्र, कुटुंबीय आणि चाहत्यांचे त्याने आभार मानले.
अर्जुन बिजलानी हा टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेता असून ‘नागिन’ या मालिकेमुळे त्याला विशेष प्रसिद्धी मिळाली. त्याच्या अभिनयामुळे त्याचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. त्यामुळे अपघाताची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये साहजिकच चिंता निर्माण झाली होती. मात्र, अर्जुनने स्वतः समोर येत आपण सुरक्षित असल्याचे सांगितल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.