नवी दिल्ली
cockroach janata party केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचा आरोप करत कॉक्रोच जनता पार्टीने पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीने 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे शांततापूर्ण मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला असून, इंडिया गेट ते दिल्ली पोलीस मुख्यालय असा हा मोर्चा काढण्यात येणार आहे. नीट परीक्षेतील पीडित कुटुंबीय तसेच आंदोलनादरम्यान कथित पोलीस अत्याचाराला बळी पडलेल्या कुटुंबीयांकडून या मोर्चाचे नेतृत्व करण्यात येणार असल्याचे पक्षाने प्रसिद्धिपत्रकातून स्पष्ट केले आहे.
जुलै महिन्यात दिल्ली येथे आंदोलन सुरू असताना केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांकडून काही आश्वासने देण्यात आली होती. त्या आश्वासनांवर विश्वास ठेवून देशभरातील आंदोलन सद्भावनेने मागे घेण्यात आले होते. मात्र, सरकार आपल्या शब्दावर कायम आहे का, याबाबत पक्षाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सरकारकडून मागण्यांबाबत वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला.
सरकार तांत्रिक बाबींच्या आड लपून भारताच्या सर्वोच्च न्यायालयासमोरही स्पष्ट भूमिका घेण्याचे टाळत असल्याचा आरोप कॉक्रोच जनता पार्टीने केला आहे. 18 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला देशभरात नोंदवण्यात आलेल्या एफआयआरची यादी सादर करण्यास वारंवार सांगितले होते. या सर्व प्रकरणांचा एकत्रित विचार करून एकाचवेळी त्यांचा निपटारा करता यावा, यासाठी ही माहिती सादर करण्याचा आग्रह न्यायालयाने धरला होता. मात्र, त्यानंतरही सरकारने स्पष्ट आश्वासन देण्यास नकार दिल्याचा दावा पक्षाने केला आहे.
यामुळे सीजेपीला देण्यात आलेली सरकारची लेखी आश्वासनेही अद्याप प्रलंबित असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. सरकारच्या धोरणांमुळे पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असून, शब्द देऊनही त्याचे पालन न होणे हा विश्वासघात असल्याची टीका पक्षाने प्रसिद्धिपत्रकातून केली आहे.
दरम्यान, शाळांमधील मूलभूत सुविधांच्या प्रश्नावरही कॉक्रोच जनता पार्टीने सरकारकडे माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे. पक्षाचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी यासंदर्भात राज्य सरकारला पत्र पाठवून शाळांच्या दुरवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्षे झाली असतानाही राज्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना पुरेसे आणि योग्य पिण्याचे पाणी मिळत नाही, स्वच्छतागृहांची स्थिती समाधानकारक नाही, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी योग्य व्यवस्था नाही तसेच अनेक ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ‘स्कूल ठीक करो’ अभियानादरम्यान अनेक ठिकाणची माहिती समोर आल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.सरकारने राज्यातील किती सरकारी शाळांचे गेल्या पाच वर्षांत नूतनीकरण केले, सध्या किती शाळांना दुरुस्ती अथवा संपूर्ण नूतनीकरणाची आवश्यकता आहे, याची माहिती जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर मंजूर शिक्षक पदांपैकी किती पदे भरलेली आहेत आणि किती रिक्त आहेत, याचाही तपशील मागण्यात आला आहे.
गेल्या पाच वर्षांत सरकारी शाळांसाठी किती निधी मंजूर करण्यात आला आणि त्यापैकी प्रत्यक्षात किती निधी खर्च झाला, याची माहितीही सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षणाची वाजवी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी राज्यात आणखी किती सरकारी शाळांची आवश्यकता आहे, याबाबतही सरकारने स्पष्ट आकडेवारी द्यावी, असे अभिजीत दिपके यांनी पत्रात म्हटले आहे.याशिवाय अध्यापनाच्या कामाव्यतिरिक्त सरकारी शाळांमधील शिक्षकांना कोणती शिक्षणेतर कामे आणि जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत, याची माहितीही मागण्यात आली आहे. सध्या किती सरकारी शाळांमध्ये संगणक आणि डिजिटल शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत, किती शाळांमध्ये स्वच्छ व कार्यरत स्वच्छतागृहे आहेत, तसेच विद्यार्थ्यांसाठी योग्य क्रीडा सुविधा आणि क्रीडा साहित्य किती शाळांमध्ये उपलब्ध आहे, याचाही तपशील तातडीने सार्वजनिक करण्याची मागणी कॉक्रोच जनता पार्टीने केली आहे.सरकारकडून दिलेली आश्वासने, सर्वोच्च न्यायालयासमोरील प्रलंबित प्रश्न आणि सरकारी शाळांमधील मूलभूत सुविधांची स्थिती या मुद्द्यांवरून 5 सप्टेंबरच्या मोर्चात सरकारला जाब विचारण्यात येणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.