नाशिक
rupali chakankar नाशिक येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी भोंदू अशोक खरात याच्याशी पूर्वी असलेल्या ओळखीचा संदर्भ देत राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली निलेश चाकणकर यांच्याबाबत सोशल मीडियावर अश्लील, अपमानास्पद आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिंद मारुती गोरे, सपना नंदकिशोर राऊत यांच्यासह इतरांविरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आला असून, चाकणकर (वय ४३, रा. धायरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
तक्रारीनुसार, सुमारे नऊ वर्षांपूर्वी सामाजिक कार्यक्रमादरम्यान चाकणकर यांची नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर त्या मंदिरातील विविध कार्यक्रमांसाठी तेथे जात होत्या. दरम्यान, १८ मार्च २०२६ रोजी खरात याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांतून समोर आल्यानंतर चाकणकर आणि खरात यांचे सार्वजनिक कार्यक्रमांतील जुने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. २० मार्चपासून संगीता तिवारी, ॲड. अशोक बेदरे, अश्विनी खाडे, रूपाली ठोंबरे, सुषमा अंधारे तसेच दिपाली सय्यद यांच्यासह इतरांनी चाकणकर यांच्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या पोस्टवर मिलिंद गोरे, सपना राऊत आणि इतरांनी अश्लील तसेच अपमानास्पद शेरेबाजी केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे मानसिक त्रास सहन करावा लागला असून, आपली प्रतिष्ठा धुळीस मिळाल्याचे चाकणकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी थेट सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्याआधारे भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित सोशल मीडिया पोस्ट, कमेंट्सचे स्क्रीनशॉट तसेच इतर कागदपत्रे पोलिसांकडे सादर करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे करीत आहेत.