सिंधुदुर्ग
gujarat fishing boats समुद्रातील खवळलेल्या लाटा आणि प्रतिकूल हवामानामुळे मासेमारी व्यवसायावर परिणाम झाला असून, खोल समुद्रात जाणे धोकादायक बनल्याने गुजरातमधील ६० हून अधिक मासेमारी नौकांनी सुरक्षिततेसाठी देवगड बंदराचा आश्रय घेतला आहे. नैसर्गिकदृष्ट्या सुरक्षित बंदर म्हणून ओळख असलेल्या देवगडमध्ये परराज्यातील नौका दाखल झाल्याने बंदर परिसर सध्या गजबजून गेला आहे.
समुद्रातील वातावरण बिघडल्याने मच्छीमारांना मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग आणि समुद्रातील लाटांची तीव्रता वाढल्याने समुद्रात असलेल्या नौकांनी सुरक्षित किनारा गाठण्यास सुरुवात केली. त्यातूनच गुजरातमधील ६०हून अधिक नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत.
देवगड बंदराला नैसर्गिक संरक्षण लाभलेले असल्याने खराब हवामानाच्या काळात परराज्यातील मच्छीमारी नौकांसाठी हे महत्त्वाचे आश्रयस्थान ठरते. यापूर्वीही समुद्रात वादळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर गुजरातसह इतर राज्यांतील नौकांनी देवगड बंदरात आश्रय घेतला आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांसोबतच परराज्यातील मच्छीमारांसाठीही या बंदराचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
सध्या समुद्रातील परिस्थिती अनुकूल नसल्याने मासेमारी ठप्प झाली आहे. हवामान निवळल्यानंतर आणि समुद्र शांत झाल्यानंतर आश्रयाला आलेल्या नौका पुन्हा मासेमारीसाठी समुद्रात रवाना होण्याची शक्यता आहे. मात्र, तोपर्यंत नौका सुरक्षित बंदरातच थांबवण्यात आल्या आहेत.वादळी हवामानाच्या काळात परराज्यातील नौकांचा देवगडकडे वाढता ओढा पाहता या बंदराचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे देवगड बंदराचा अधिक वेगाने आणि आधुनिक सुविधांसह विकास करावा, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.