मुंबई
dont be shy movie प्राइम व्हिडिओने आपल्या आगामी ओरिजिनल चित्रपट ‘डोंट बी शाय’च्या जागतिक स्ट्रीमिंग प्रीमियरची तारीख जाहीर केली असून, हा चित्रपट २५ सप्टेंबर रोजी जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंग-अडल्ट रोमँटिक कॉमेडी असलेल्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्रीति मुखर्जी यांनी केले आहे. भारतातील सर्वात मोठ्या एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल्स स्ट्रीमिंग सेवांपैकी एक असलेल्या प्राइम व्हिडिओवर या चित्रपटाचा वर्ल्डवाइड प्रीमियर होणार आहे.
आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट यांनी त्यांच्या इंटरनल सनशाइन प्रोडक्शन्स या बॅनरखाली ‘डोंट बी शाय’ची निर्मिती केली आहे. ग्रिश्मा शाह आणि विकेश भूटानी हे या चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. चित्रपटातून आरुषि बजाज, अंश दुग्गल, बियांका अरोरा आणि पीयूष खाटी हे चार नवोदित कलाकार प्रमुख भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
ही कमिंग-ऑफ-एज रोमँटिक कॉमेडी चार तरुणांच्या आयुष्याभोवती गुंफण्यात आली आहे. मैत्री, पहिलं प्रेम, हृदयभंग, स्वप्नं आणि तरुण वयात स्वतःला तसेच आयुष्याला समजून घेण्याचा गुंतागुंतीचा प्रवास या चित्रपटातून उलगडला जातो. कुणाल रॉय कपूर, अनुराग बसु, नेहा धूपिया आणि अंजू अल्वा नाईक यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
प्राइम व्हिडिओ आणि अमेझॉन MGM स्टुडिओज इंडियाच्या ओरिजिनल्स विभागाचे डायरेक्टर आणि हेड निखिल माधोक यांनी चित्रपटाच्या प्रीमियरची घोषणा करताना ‘डोंट बी शाय’ हा त्यांच्या सर्वात खास चित्रपटांपैकी एक असल्याचे सांगितले. अखेर या चित्रपटाच्या ग्लोबल स्ट्रीमिंग प्रीमियरची घोषणा करताना आनंद होत असल्याचे त्यांनी नमूद केले. आरुषि, अंश, बियांका आणि पीयूष या चार नव्या कलाकारांची प्रेक्षकांना ओळख करून देताना त्यांचा अभिनय ताजेपणा आणि प्रामाणिकपणा घेऊन येतो, असेही त्यांनी सांगितले.श्रीति मुखर्जी यांच्या दिग्दर्शनाखाली आणि आलिया व शाहीन भट्ट यांच्या क्रिएटिव्ह दृष्टिकोनातून साकारलेला ‘डोंट बी शाय’ हा मैत्री, प्रेम आणि मोठं होण्याच्या सुंदर, पण तितक्याच गुंतागुंतीच्या प्रवासाचा मनापासून उत्सव साजरा करणारा चित्रपट असल्याचे माधोक यांनी म्हटले. प्रेक्षकांनी ‘शाय’च्या जगात पूर्णपणे रमून जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.इंटरनल सनशाइन प्रोडक्शन्सच्या सह-संस्थापक आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट यांनी संयुक्त निवेदनातून चित्रपटाबद्दलचा आनंद व्यक्त केला. ‘डोंट बी शाय’ हा सुरुवातीपासूनच त्यांच्यासाठी अत्यंत खास प्रकल्प राहिला असून, तो अशा स्वरूपात आकार घेताना पाहून अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणपणातील त्या महत्त्वपूर्ण टप्प्याची खरी भावना चित्रपटातून मांडण्यात आली आहे. आयुष्य बदलून टाकणाऱ्या मैत्रीपासून ते आयुष्यावर कायमचा ठसा उमटवणाऱ्या पहिल्या प्रेमापर्यंत, दीर्घकाळ स्मरणात राहणाऱ्या हृदयभंगापासून स्वतःची खरी ओळख हळूहळू समजून घेण्यापर्यंतचा प्रवास या कथेत असल्याचे त्यांनी नमूद केले.
चित्रपटातील नव्या कलाकारांबद्दल दोघींनी विशेष उत्साह व्यक्त केला. त्यांची ऊर्जा, संवेदनशीलता आणि एकमेकांमधील केमिस्ट्री विशेष असल्याचे सांगत त्यांनी या कलाकारांनी आपल्या व्यक्तिरेखा जिवंत केल्याचे म्हटले. भारतासह जगभरातील प्रेक्षकांनी ‘शाय’ची भेट घ्यावी आणि त्याच्या सुंदर, किंचित गुंतागुंतीच्या जगाचा भाग व्हावे, अशी आतुरता त्यांनी व्यक्त केली.
‘डोंट बी शाय’चा प्रीमियर जगभरातील २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये केवळ प्राइम व्हिडिओवर होणार आहे. हा चित्रपट हिंदी भाषेत इंग्रजी सबटायटल्ससह स्ट्रीम केला जाणार आहे.