डोवाल चीनमध्ये पोहोचताच हालचालींना वेग!

शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याची चर्चा

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
बीजिंग,
Doval meets with Chinese Vice President भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांची बीजिंगमध्ये भेट घेतली. भारत आणि चीनमधील सीमावाद तसेच द्विपक्षीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग १२-१३ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारतात येण्याची शक्यता आहे.शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी दोन्ही देशांतील अधिकारी त्यांच्या संभाव्य दौऱ्याबाबत आशावादी आहेत. ते भारतात आले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट होण्याची शक्यता आहे. या बैठकीत भारत-चीन संबंध पुढे नेण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा होऊ शकते.
 
 
 
dobhal
 
विशेष प्रतिनिधींच्या चर्चेच्या २५व्या फेरीपूर्वी अजित डोवाल आणि हान झेंग यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. सीमावर्ती भागात शांतता आणि स्थैर्य कायम ठेवण्याच्या उपायांवर दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. त्याचबरोबर आर्थिक, राजकीय आणि बहुपक्षीय क्षेत्रांमध्ये भारत-चीन संबंध अधिक मजबूत करण्याच्या दिशेनेही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीच्या पॉलिटब्युरोचे सदस्य आणि परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या निमंत्रणावरून अजित डोवाल बीजिंगमध्ये पोहोचले आहेत. ते वांग यी यांच्यासोबत भारत-चीन सीमावादावर विशेष प्रतिनिधी पातळीवरील चर्चेत सहभागी होणार आहेत. भारत आणि चीनमधील ३,४८८ किलोमीटर लांबीच्या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी २००३ मध्ये विशेष प्रतिनिधी संवादाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
 
 
दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी २२ ऑगस्ट रोजी चीनसोबतच्या संबंधांबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली होती. चांगले द्विपक्षीय संबंध निर्माण करण्यासाठी सीमावर्ती भागात शांतता आणि स्थैर्य असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबनसिरी भागात चिनी सैनिकांच्या आक्रमक वर्तनाच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांचे हे वक्तव्य आले होते. जयशंकर यांनी २०२० च्या उन्हाळ्यापासून २०२४ च्या हिवाळ्यापर्यंतचा काळ भारत-चीन संबंधांसाठी अत्यंत कठीण असल्याचे म्हटले. या काळातील तणावाचे मुख्य कारण सीमावर्ती परिस्थिती असल्याचे त्यांनी नमूद केले. सीमावर्ती भागातील परिस्थितीच दोन्ही देशांमधील संबंधांची दिशा मोठ्या प्रमाणावर निश्चित करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी १२ ऑगस्ट रोजी भारत-चीन सीमेवरील परिस्थिती सध्या सर्वसाधारणपणे स्थिर असल्याचे सांगितले होते. त्यामुळे अजित डोवाल आणि हान झेंग यांची भेट तसेच आगामी विशेष प्रतिनिधी चर्चा भारत-चीन संबंधांमध्ये पुढील काळात कोणते बदल घडतात, यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.