चालत्या बसमध्ये महिलेच्या अंगावर लघुशंका

अहिल्यानगरमधील संतापजनक प्रकार

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
अहिल्यानगर
ahilyanagar bus incident महिला सुरक्षेसाठी सरकारकडून कठोर कायदे आणि विविध नियम करण्यात आले असले, तरी महिलांविरोधातील गुन्ह्यांचे प्रकार थांबताना दिसत नाहीत. अहिल्यानगर येथे चालत्या बसमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचा संतापजनक आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे. परभणी जिल्ह्यातील कळमनुरी येथून पिंपरी-चिंचवडकडे जाणाऱ्या बसमध्ये रविवारी पहाटे ही घटना घडली.
 

drunk man urinates on woman in moving bus in ahilyanagar bus incident passengers remove accused and police detain him 
मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरी येथून एक महिला बसमध्ये प्रवासासाठी बसली होती. त्यानंतर बीड जिल्ह्यातील उमापूर येथून एका व्यक्तीने बसमध्ये प्रवेश केला. हा प्रवासी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. पहाटेच्या सुमारास त्याने चालत्या बसमध्ये महिलेच्या अंगावर लघुशंका केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिला आणि इतर प्रवाशांना धक्का बसला.
घटना लक्षात येताच बसमधील दिवे लावण्यात आले. त्यानंतर संतप्त प्रवाशांनी संबंधित मद्यधुंद व्यक्तीला बसमधून खाली उतरवले. या घटनेची माहिती पोलिसांनाही देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी लघुशंका करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. मात्र, या प्रकरणी कोणाकडूनही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याने पोलिसांनी काही वेळानंतर संबंधित व्यक्तीला समज देऊन सोडून दिले.
चालत्या बसमध्ये महिलेच्या अंगावर लघुशंका करण्यासारखा गंभीर प्रकार घडल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः मद्यधुंद अवस्थेतील प्रवाशांना सार्वजनिक आणि सरकारी बसमध्ये प्रवेश द्यायचा की नाही, तसेच अशा प्रवाशांवर प्रतिबंधात्मक कारवाई कशी करायची, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकारी असो वा खासगी, सार्वजनिक वाहतुकीत महिलांना विविध प्रकारे त्रास दिला जाण्याच्या घटना समोर येत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान, जळगावमध्येही बसस्थानकाशी संबंधित दुसरी घटना समोर आली आहे. जळगावच्या बसस्थानकात प्रवाशांचे दागिने चोरी करणाऱ्या दोन सराईत महिलांना जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. उषा चंदन ससाने आणि अनिता विजय ससाने अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. दोघी नात्याने देवरानी आणि जेठाणी असून, त्यांनी चोरीची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दोन्ही महिलांकडून एकूण एक लाख पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच जळगाव शहर आणि अमळनेर पोलिस ठाण्यांतही या दोघींविरोधात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.