कर्मचाऱ्यांचे मराठी प्रेम : नावे देवनागरीत, उच्चार मात्र इंग्रजी..!

शासकीय कर्मचारी ‘अशी’ लिहितात मराठी

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ
yavatmal-news marathi  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर शासकीय कार्यालयांमध्ये मराठीचा वापर वाढविण्यावर भर दिला जात आहे. कार्यालयीन कामकाज, फलक आणि कागदपत्रांमध्ये मराठीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. मात्र, काही शासकीय कार्यालयांमध्ये मराठीचा वापर करण्याची अशी काही अनोखी पद्धत पाहायला मिळत आहे की, पाहणाऱ्यालाही क्षणभर प्रश्न पडावा..!
 
marathi
 
शासकीय कार्यालयांतील काही कर्मचाऱ्यांच्या  नावांच्या आद्याक्षरांमध्ये ‘के. डी.’, ‘ए. टी.’, ‘बी. एस.’ अशा स्वरूपाचा वापर केला जातो. विशेष म्हणजे ही आद्याक्षरे देवनागरी लिपीत लिहिलेली असली, तरी त्यांचा उच्चार मात्र चक्क इंग्रजी पद्धतीने केला जातो. म्हणजे अक्षर मराठी, पण उच्चार इंग्रजी !
 
मराठीत नावे लिहिण्याची सक्ती झाल्याने कर्मचाèयांची नावे देवनागरी लिपीत आली. मात्र, नावाच्या आद्याक्षरांचा इंग्रजी पद्धतीने उच्चार करण्याची सवय काही ठिकाणी कायम असल्याचे दिसून येते. त्यामुळे ‘केडी’ हे ‘केडी’च, ‘एटी’ हे ‘एटी’च आणि ‘बीएस’ हे ‘बीएस’च !
मराठी भाषेचा वापर केवळ अक्षरे बदलण्यापुरता मर्यादित न राहता तिचा उच्चार, शब्दरचना आणि व्यवहारातील वापरही मराठी पद्धतीने व्हावा, अशी अपेक्षा भाषाप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
‘नाव मराठीत, सही मराठीत, कागदपत्रे मराठीत, मग उच्चारही मराठीत का नाही’, असा मिश्कील प्रश्नही नागरिकांकडून विचारला जात आहे. मराठीचा अभिमान केवळ देवनागरीपुरता न राहता तो बोलण्यात आणि उच्चारातही दिसायला हवा. अन्यथा ‘मराठी नावाला इंग्रजी उच्चार’ अशी विसंगत स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये मराठीचा वापर वाढविण्याचा उद्देश निश्चितच स्वागतार्ह आहे, मात्र मराठी म्हणजे केवळ देवनागरी अक्षरे नव्हे, तर तिचा स्वाभाविक उच्चार आणि व्यवहारातील सहज वापरही आहे, हेही लक्षात घेण्याची गरज आहे.
 
शासन आदेशांची ऐशीतैशी..!
मुळात अधिकाऱ्यांच्या  नावांच्या पाट्या कशा असाव्यात याचे स्पष्ट शासन निर्देश आहेत. मराठी किंवा देवनागरीत नाव लिहायचे झाल्यास ते मराठीतच लिहायला हवे आहे. एखाद्याचे नाव गणेश तुकाराम ठाकरे असेल तर ते तसेच लिहावे. नुसते गणेश ठाकरे असेही लिहिता येते. पण आद्याक्षरे लिहायची असल्यास ग. तु. ठाकरे असेच लिहावे, जी. टी. ठाकरे असे लिहिताच येत नाही, असे स्पष्ट शासन आदेश आहेत. पण हे आदेश संबंधित खातेप्रमुखाला माहीत असतील तरच बदल किंवा अंमल शक्य आहे.