अनिल कांबळे
नागपूर
encroachment-and-traffic-issue धंतोली, रामदासपेठमधील हॉस्पिटल्स, अतिक्रमण, वाहतुकीचा प्रश्न कायम असल्यामुळे येत्या मंगळवारी (1 सप्टेंबर) रोजी शहर वाहतूक पोलिस उपायुक्त आणि मनपाचे सहाय्यक आयुक्त यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिलेत. तसेच मनपाचे सहाय्यक आयुक्त आणि वाहतूक उपायुक्त यांनी प्रत्यक्ष धंतोली, रामदासपेठ येथील वाहतूक, पार्किंग, वन वे आणि पार्क केलेल्या चार चाकी वाहनांची पाहणी करावी आणि अहवाल 1 सप्टेंबर रोजी न्यायालयात सादर करावा, असे आदेश न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांनी मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान दिलेत.

धंतोली नागरिक मंडळाच्यावतीने धंतोली, रामदासपेठमधील अतिक्रमण, वाहतुकीचा प्रश्न याबाबत दाखल जनहित याचिकेवर उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. मनपा आयुक्त आणि वाहतूक पोलिस उपायुक्त यांनी जुन्या हायकोर्टाच्या आदेशांचे पालन न केल्याची बाब याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी निदर्शनास आणून दिली. धंतोलीतील काही हॉस्पिटल्स परिसरात नो पार्किंग झोन असतानाही त्या ठिकाणी वाहने पार्क केली जातात तर काही परिसर नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आला नाही. वाहतुकीची समस्या कायम असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने वाहतूक पोलिस उपायुक्तांना विचारणा केली की , याप्रकरणी का पावले उचलली नाहीत?. न्यायालयाने मंगळवारी, दुपारी 2.30 वाजता सुनावणीदरम्यान वाहतूक उपायुक्त व मनपा सहाय्यक आयुक्त यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिलेत.
दरम्यान अवैध बांधकामाबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार धंतोलीतील हॉस्पिटल्सला मनपाने फेब्रुवारी व मार्चमध्ये कारणे दाखवा नोटीस बजावली असली तरी या नोटीसेस देण्यात आल्यामुळे गोंधळ उडाला होता. दुसरीकडे काही जणांनी आमचे लहान क्लिनिक असल्याचे सांगत नोटीसला विरोध केला होता. जे नागरिक नियमांचे पालन करीत नाही, त्यांच्यावर दंड का आकारू नये?, अशीही विचारणा न्यायालयाने मागील सुनावणीत केली होती. धंतोली नागरिक मंडळातर्फे अॅड. आशुतोष धर्माधिकारी, अॅड. अश्विन देशपांडे, मनपातर्फे अॅड. जेमिनी कासट, सरकारतर्फे अॅड. दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली.