मुंबई
fda action अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएकडून राज्यभर कारवाईचा धडाका सुरू असतानाच जनजागृती आणि संबंधितांना मार्गदर्शन करण्यावरही भर दिला जात आहे. शाळकरी मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची नियमावली जाहीर केल्यानंतर तिची योग्य माहिती शिक्षक आणि शाळा प्रशासनाला मिळावी, तसेच मुलांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये, यासाठी एफडीएकडून राज्यस्तरीय कार्यशाळांची व्यापक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
२८ जुलै ते २१ ऑगस्ट या कालावधीत राज्यभरातील शाळांना त्यांच्यासाठी आखून दिलेल्या नियमावलीची माहिती देण्यासाठी ९८ कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळांमध्ये २२ हजार ४४३ शाळांनी सहभाग घेतला असून २५ हजार १०८ शिक्षक सहभागी झाले. याच कालावधीत २५० शाळांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ११ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर चार ठिकाणचे परवाने रद्द करण्यात आले. अतिशय गंभीर स्थिती आढळलेल्या दोन ठिकाणचे व्यवसाय थेट बंद करण्याचे आदेशही देण्यात आले.
दरम्यान, गेल्या आठवडाभरात एफडीएच्या पथकांनी राज्यभरातील ४५ हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाब्यांची तपासणी केली. त्यापैकी ३३ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आली असून ११ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये वांद्रे-कुर्ला संकुलातील प्रतिष्ठित मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील आस्थापनासह दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील प्रसिद्ध कॅफे कॅडेलाचाही खाद्य परवाना निलंबित करण्यात आला आहे.
बीकेसीतील प्रतिष्ठित मुंबई क्रिकेट असोसिएशनवर २० ऑगस्ट रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी केली. तेथील परमिट रूमची पाहणी करताना किचनमधील एका फ्रीजमध्ये बर्फ साचलेला आढळला. किचनच्या प्रवेशद्वाराजवळील फरशीही अस्वच्छ होती. एफएसएसएआयचा परवाना प्रमुख ठिकाणी दर्शनी भागात प्रदर्शित केलेला नव्हता. खाद्यतेलाचा रंग, वास आणि इतर घटकांच्या आधारे केली जाणारी नियमित तपासणीही तेथे केली जात नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
याशिवाय भाजीपाला आणि ठेवण्यात आलेला अन्य कृषीजन्य कच्चा माल खराब अवस्थेत आढळून आला. आस्थापनेतील कर्मचारी स्वच्छता आणि सॅनिटेशनच्या व्यवस्थेचे अपेक्षित निकषांनुसार पालन करत नसल्याचेही तपासणीत समोर आले. या त्रुटींच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने नियमानुसार संबंधित आस्थापनेचा परवाना निलंबित केला.
दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील प्रसिद्ध कॅफेचीही अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तेथील किचनमध्ये अस्वच्छता, बुळबुळीत झालेले दरवाजे, किटकांचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभाव, कर्मचाऱ्यांना हात धुण्यासाठी असलेली अपुरी सुविधा तसेच स्वच्छतागृहांसह अन्य सुविधांची कमतरता आढळून आली. शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थही योग्य प्रकारे वेगळे ठेवले जात नसल्याचे तपासणीत आढळले. या सर्व त्रुटींमुळे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी या प्रसिद्ध कॅफेचा खाद्य परवाना निलंबित केला.
पूर्व उपनगरातील काही आस्थापनांवरही एफडीएकडून कारवाई करण्यात आली. कुर्ला येथील संकल्प महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था आणि मुलुंड परिसरातील ‘चायना टाऊन’ नावाच्या चायनीझ स्टॉलची तपासणी करण्यात आली. या ठिकाणी अन्नसुरक्षा निकषांच्या पालनाबाबत अतिशय गंभीर त्रुटी आढळून आल्या.
तपासणीदरम्यान अन्न fda action तयार करण्याचा परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी स्थितीत नसल्याचे निदर्शनास आले. स्वयंपाकघरात घाण, अन्नाचे अवशेष आणि अपुरी स्वच्छता व्यवस्था आढळली. भिंती, छत आणि इतर अनेक ठिकाणी डाग पडलेले होते, तर चिकटलेले ग्रीसही आढळून आले. आस्थापनेच्या अंतर्गत भागातील फिटिंग्स अस्वच्छ आणि खराब अवस्थेत असल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले. त्यामुळे या आस्थापनांवरही नियमानुसार कारवाई करण्यात आली. याबाबतची माहिती एफडीएकडून सोमवारी सायंकाळी जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकातून देण्यात आली.
कारवाईसोबतच जनजागृती आणि मार्गदर्शनालाही प्राधान्य देत एफडीएकडून राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेमुळे अन्नसुरक्षा नियमांचे पालन, विशेषतः शाळकरी मुलांच्या आरोग्याशी संबंधित नियमांची अंमलबजावणी, याबाबत संबंधित यंत्रणा आणि आस्थापनांना अधिक स्पष्ट मार्गदर्शन मिळत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.