सामान्य रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणेची पाईपलाईन ‘आजारी’

नपच्या पत्रव्यवहारानंतरही दुरुस्तीची बोंब

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
वर्धा
wardha-news एखाद्या वेळेस आग लागल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोट्यवधी रुपये खर्च करून थेट प्रत्येक वार्डाच्या बाजूला पाईपलाईन टाकण्यात आली होती. मात्र, नादुरुस्त असलेली ही पाईपलाईन अद्यापही दुरुस्त करण्यात आली नाही. अमरावती येथील रुग्णालात झालेल्या घटनेनंतर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटना पुन्हा पुढे आली आहे. या पाईप लाईन संदर्भात नगर पालिका प्रशासनाने सामान्य रुग्णालय प्रशासनाला फोन केल्यानंतरही रुग्णालय प्रशासन झोपेतून जागे झाले नाही.
 
wardha photo
 
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारत २ मध्ये कृष्णा डायगनोस्टिक सेंटर तयार करण्यात आले. या सेंटरचे काम सुरू असतानाच अग्निशमन यंत्रणेची पाईपलाईन तुटली. तर याच ठिकाणी अनेक भागात या अग्निशमन यंत्रणेच्या पाईपलाईन क्षतिग्रस्त झाल्या आहे. यासंदर्भात नगर परिषद अग्निशमन विभागाकडून आरोग्य यंत्रणेला दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, नपच्या पत्रव्यवहारानंतरही दुरुस्तीची बोंबच दिसून येत आहे.
 
जिल्हा सामान्य रुग्णालयात इमारत क्रमांक २ मध्ये मे महिन्यात आग लागली होती. अगदी दक्षता विभागाच्या जवळ असलेल्या एका औषधी ठेवलेल्या खोलीत ही आग लागली होती. आग लागल्यावर मात्र अग्निशमन यंत्रणा निकामी ठरली. ऐनवेळी स्प्रिंकलर सुरु झाले नसल्याने ही आग चांगलीच पसरली होती. रुग्णालयात लागणार्‍या आगीच्या घटनांमुळे रुग्णालय प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला जाग येईल अशी शयता वर्तविण्यात आली होती. त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक सुमंत वाघ यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून लावण्यात आलेली अग्निशमन यंत्रणा सुरूच नसल्याचे माध्यमांना सांगितले होते. असे असताना जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालयांचे फायर ऑडिट होणे अपेक्षित होते. वर्धा नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाने आतापर्यंत चार ते पाच पत्र आरोग्य यंत्रणेला पाठविली आहे. त्याचा पाठपुरावा देखील करण्यात आला आहे. पण, अद्याप सुचविण्यात आलेल्या दुरुस्त्या अधिकारी आणि कंत्राटदार यांच्याकडून करण्यात आल्या नाही.