रामगिरी महाराजांच्या केसालाही हात लावू देणार नाही- फडणवीस

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
अहिल्यानगर,
government stands behind Ramgiri Maharaj सरला बेट येथे श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी रामगिरी महाराजांना धमक्या देणाऱ्यांना कठोर शब्दांत इशारा दिला.रामगिरी महाराजांना काही लोकांकडून धमक्या दिल्या जात असल्याचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “धमक्या देणाऱ्यांना आम्ही नेस्तनाबूत करू. येथील कोणाच्याही केसाला हात लावू देणार नाही.” धर्माच्या नावावर कोणी अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा सामना करण्यासाठी आपण सर्वांच्या पुढे राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन करावे आणि इतर धर्मांचाही आदर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
 
 
 
arla
 
सरकारच्या कामाचा उल्लेख करताना फडणवीस यांनी शेतकरी आणि कष्टकरी वर्गासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उपक्रम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांना ३६५ दिवस दिवसा आठ तास वीज देण्याचे काम सरकार करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे महत्त्व सांगताना फडणवीस म्हणाले की, अनेक वर्षांपासून सनातन विचार आणि संस्कृतीचा वारसा पुढे सुरू आहे. विविध आक्रमणांमुळे किल्ले जिंकले गेले आणि मंदिरे उद्ध्वस्त झाली, मात्र वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षांची परंपरा कायम राहिली. पंढरपूरकडे जाणारी आपली पावले कधीही थांबली नाहीत आणि कोणाच्याही विचारांचे गुलाम झालो नाही, असे त्यांनी सांगितले.
 
१७९ वर्षांपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामुळे समाज एकत्र येतो. येथे जात-पात न पाहता सर्वजण एकत्र येतात, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी रामगिरी महाराजांच्या कार्याला अभिवादन केले. सरला बेटाच्या विकासाचाही त्यांनी उल्लेख केला. सरकारने सरला बेटासाठी विकास आराखडा तयार केला असून भविष्यात हे ठिकाण ऊर्जेचे केंद्र आणि प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकसित केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.दरम्यान, कार्यक्रमातील वातावरणही उत्साहपूर्ण पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी फुगडी खेळली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामगिरी महाराज यांच्यातही फुगडीचा खेळ रंगला.