
दिनेश कार्तिकचा जन्म चेन्नईमध्ये झाला असून त्याने तामिळनाडूचे प्रतिनिधित्व करत देशांतर्गत क्रिकेटही खेळले आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो आरसीबीसाठी मेंटॉर म्हणून काम करत आहे. या काळात आरसीबीची कामगिरीही चांगली राहिली आहे. हेडन यांच्या मते, सीएसकेसारख्या मोठ्या फ्रँचायझीला स्थानिक क्रिकेटशी जोडलेली व्यक्ती हेड कोच म्हणून मिळणे फायदेशीर ठरू शकते. हेडन यांनी सांगितले की, हेड कोचच्या शर्यतीत काही नावे चर्चेत आहेत आणि त्यापैकी दिनेश कार्तिकचे नावही आहे. कार्तिक अशा प्रकारची जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार असू शकतो, असेही त्यांनी म्हटले. अनेक फ्रँचायझी परदेशी प्रशिक्षकांना पसंती देत असल्या तरी सीएसकेने हेड कोच म्हणून चेन्नईशी स्थानिक नाते असलेल्या व्यक्तीचा विचार करायला हवा, असे हेडन यांनी स्पष्ट केले.
कार्तिकचे स्थानिक कनेक्शन हा त्याच्या बाजूचा एक महत्त्वाचा मुद्दा असला, तरी त्याचा प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफमधील अनुभवही महत्त्वाचा मानला जात आहे. गेल्या तीन वर्षांत तो आयपीएलमध्ये आरसीबीच्या सपोर्ट स्टाफचा भाग राहिला आहे. या काळात आरसीबीने २०२५ आणि २०२६ मध्ये विजेतेपद मिळवले होते. दरम्यान, स्टीफन फ्लेमिंग यांनी एमएस धोनीसोबत सीएसकेमध्ये दीर्घकाळ काम करताना संघाला सातत्याने मजबूत ठेवले. त्यामुळे त्यांच्या जागी योग्य व्यक्तीची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही मॅथ्यू हेडन यांनी म्हटले आहे. आता सीएसके व्यवस्थापन दिनेश कार्तिकच्या नावाचा किती गांभीर्याने विचार करते, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.