हैदराबाद
ips vaibhav gaikwad महाराष्ट्रात सध्या तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईची चर्चा सुरू असतानाच तेलंगणात मराठमोळे आयपीएस अधिकारी वैभव गायकवाड यांच्या कारवाईचीही जोरदार चर्चा रंगली आहे. हैदराबादसह तेलंगणात भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा विडा उचलल्याचे त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मोहिमेतून दिसून येत आहे. मूळचे अहिल्यानगरचे असलेले वैभव गायकवाड सध्या हैदराबादमध्ये टास्क फोर्सच्या डीसीपी पदावर कार्यरत आहेत.
हैदराबादमध्ये डीसीपी वैभव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील H-FAST (Hyderabad Food Adulteration Surveillance Team) पथकाने अन्नभेसळ करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली. अवैधरीत्या भेसळयुक्त तुपाचे उत्पादन आणि व्यापार करणाऱ्या आस्थापनांवर छापे टाकत तब्बल 36 टन भेसळयुक्त तूप जप्त करण्यात आले. यासोबतच तूप तयार करण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल आणि विविध रासायनिक पदार्थही पथकाने ताब्यात घेतले.
H-FAST ने मार्च 2026 पासून हैदराबादमध्ये अन्नभेसळीविरोधात व्यापक मोहीम सुरू केली आहे. विविध खाद्यपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्री केली जाणाऱ्या ठिकाणी छापे तसेच तपासण्या करण्यात येत असून, मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईची माहिती डीसीपी वैभव गायकवाड यांनी दिली.
मार्च 2026 पासून आतापर्यंत अन्नभेसळीशी संबंधित 208 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, तर 232 प्रकरणे Food Safety Officer कडे सोपवण्यात आली आहेत. याच काळात विविध खाद्यपदार्थांशी संबंधित मोठ्या प्रमाणावर तपासण्या आणि कारवाया करण्यात आल्या. या कारवाईत तब्बल 2 लाख 92 हजार 298 किलो, म्हणजेच सुमारे 292 टन भेसळयुक्त साहित्य जप्त करण्यात आले आहे.
जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये मसाले, तूप, दुग्धजन्य पदार्थ, मांसजन्य पदार्थ, चहा, फळे, बेकरी उत्पादनांसह Ginger-Garlic Paste यांचा समावेश आहे. खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करण्यासाठी हानिकारक रसायने, पाल्म ऑईल, वनस्पती, स्टार्च तसेच अन्य अपायकारक पदार्थांचा वापर केला जात असल्याचे तपासणीत आढळून आल्याची माहिती डीसीपी वैभव गायकवाड यांनी दिली.अन्नभेसळीविरोधातील ही मोहीम केवळ छापे आणि जप्तीपुरती मर्यादित नसून सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण, भेसळीचे संपूर्ण नेटवर्क उघड करणे आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करणे हा त्यामागील उद्देश असल्याचे वैभव गायकवाड यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अन्नभेसळ करणाऱ्या व्यावसायिकांवर सातत्याने कारवाई सुरू ठेवण्याचा निर्धार H-FAST पथकाने केला आहे.दरम्यान, वैभव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील यंत्रणेकडून अन्नभेसळीबरोबरच मादक द्रव्यांविरोधातही प्रभावी कारवाई करण्यात आली आहे. हैदराबाद सिटी नार्कोटिक्स विंगने मागील आठ महिन्यांत मादक द्रव्यांविरोधात मोठी मोहीम राबवली. या कालावधीत 400 पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले असून, 25 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे मादक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.अन्नभेसळ आणि मादक द्रव्यांविरोधातील या कारवायांमुळे हैदराबादमध्ये कायदा-सुव्यवस्था आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने कठोर पावले उचलली जात असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रातील अहिल्यानगरचे असलेले आयपीएस अधिकारी वैभव गायकवाड यांच्या धडाकेबाज कारवाईची त्यामुळे तेलंगणात विशेष चर्चा होत आहे.