कोलंबो,
Jurel's century श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने दबावाच्या परिस्थितीत शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या जुरेलने ९ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर नाबाद ११५ धावांची खेळी साकारली. मात्र, त्याच्या शतकापेक्षाही त्यानंतरचे सेलिब्रेशन अधिक चर्चेत आले. शतक पूर्ण झाल्यानंतर जुरेलने हेल्मेट काढून आनंद व्यक्त केला. त्यानंतर त्याने जर्सी वर करत आपल्या दंडावर असलेला ‘जय जवान, जय किसान’ हा टॅटू सर्वांना दाखवला. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेला हा ऐतिहासिक नारा आपल्या सेलिब्रेशनमधून दाखवत जुरेलने देशप्रेम आणि आपल्या कुटुंबाच्या मुळांशी असलेले नाते व्यक्त केले. त्याचा हा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दिवसाचा खेळ संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जुरेलने या सेलिब्रेशनमागील कारण सांगितले. त्याचे वडील भारतीय सैन्यात जवान होते आणि त्यांनी १९९९ च्या कारगिल युद्धात देशसेवा केली आहे. यापूर्वीही जुरेलने शतक साजरे करताना वडिलांना सलाम केला होता. मात्र, यावेळी त्याच्या सेलिब्रेशनमध्ये आजोबांचाही समावेश होता.आपले आजोबा शेतकरी आणि वडील सैनिक असल्याचे सांगत जुरेलने आपल्या कुटुंबाच्या मुळांची आठवण कायम ठेवण्याची भावना व्यक्त केली. आपण कुठून आलो आहोत हे कधीही विसरायचे नाही, असे त्याने सांगितले. हे शतक आणि त्याचे सेलिब्रेशन त्याने आपल्या आजोबा आणि वडिलांना समर्पित केले.
दरम्यान, कोलंबो कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसामुळे सामन्यात अनेकदा व्यत्यय आला. भारताने ५ बाद ३०० धावांवरून पुढील खेळाला सुरुवात केली आणि दिवसअखेर ९ बाद ५०३ धावांवर डाव घोषित केला. भारताकडून देवदत्त पडिक्कलने ११७ धावा, ध्रुव जुरेलने नाबाद ११५ धावा, ऋषभ पंतने ६३ धावा आणि शुभमन गिलने ५० धावांचे योगदान दिले.भारताच्या ५०३ धावांना प्रत्युत्तर देताना श्रीलंकेची सुरुवात मात्र अत्यंत खराब झाली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने ३ षटकांत ८ धावांवर २ गडी गमावले होते. त्यामुळे श्रीलंकेचा संघ भारताच्या पहिल्या डावातील धावसंख्येपासून तब्बल ४९५ धावांनी मागे होता. सामना अडचणीच्या स्थितीत असताना सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन भारताचा डाव मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ध्रुव जुरेलचे माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांकडून कौतुक होत आहे. शतकासोबतच आपल्या वडिलांप्रती आणि आजोबांप्रती व्यक्त केलेल्या भावना यामुळे जुरेलचे हे सेलिब्रेशन विशेष ठरले आहे.