न्या. सुनील शुक्रे महाराष्ट्राचे नवे लोकायुक्त!

राज्यपालांकडून पदाची शपथ

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
मुंबई,
Justice Sunil Shukre is the new Lokayukta of Maharashtra मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मंगळवारी महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. मुंबईतील लोकभवन येथे झालेल्या छोटेखानी समारंभात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी न्या. शुक्रे यांना पदाची शपथ दिली.२०२३ मध्ये लागू झालेल्या नव्या महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यानुसार न्या. सुनील शुक्रे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल किंवा ते वयाची ७० वर्षे पूर्ण करेपर्यंत राहतील. यापैकी जे आधी घडेल, त्यानुसार त्यांचा कार्यकाळ निश्चित होणार आहे.
 
 

lokbhavan 
 
शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मावळते लोकायुक्त न्या. विद्यासागर कानडे, गोवा राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे, महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेचे अन्य सदस्य तसेच मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९६१ रोजी झाला. त्यांनी १९८० मध्ये पुणे विद्यापीठातून पदवी घेतली. त्यानंतर अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. नागपूर विद्यापीठातून त्यांनी घटनात्मक कायद्यात एलएल.एम. पदवी मिळवली.
 
 
न्यायिक सेवेत न्या. शुक्रे यांनी विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. कोल्हापूर येथे प्रधान जिल्हा न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रजिस्ट्रार (प्रशासन), महाराष्ट्र न्यायिक अकादमी, उत्तन येथे सहसंचालक तसेच नागपूर येथे प्रधान जिल्हा न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केले आहे. मार्च २०११ मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांची न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली. ऑक्टोबर २०२३ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयातून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर महाराष्ट्र शासनाने त्यांची महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. आता त्यांनी महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.