नवी दिल्ली,
Kapil Dev concerned about Imran पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि दिग्गज क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी पुन्हा चिंता व्यक्त केली आहे. इम्रान खान यांच्याशी माणुसकीने वागण्याचे आणि त्यांना आवश्यक त्या सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन कपिल देव यांनी केले आहे.एका गोल्फ स्पर्धेच्या उद्घाटनावेळी बोलताना कपिल देव यांनी इम्रान खान यांच्या परिस्थितीवर भाष्य केले. पाकिस्तानमधील कायद्यांची आपल्याला माहिती नसल्याचे सांगत त्यांनी कोणताही कैदी असला तरी त्याच्याशी आदराने वागले पाहिजे आणि त्याला मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत, असे मत व्यक्त केले. इम्रान खान हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि जागतिक दर्जाचे क्रिकेटपटू राहिले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

इम्रान खान यांना शक्य तितके चांगले वैद्यकीय उपचार मिळावेत, एवढीच आपली अपेक्षा असल्याचे कपिल देव यांनी स्पष्ट केले. ही कोणती मोठी मागणी नसून मानवतेच्या दृष्टीने केलेली छोटीशी विनंती असल्याचेही त्यांनी सांगितले.इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत पाकिस्तानी क्रिकेटपटूंकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया न आल्याबद्दलही कपिल देव यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र, यासाठी त्यांनी पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना जबाबदार धरले नाही. तेथील परिस्थितीत राहणाऱ्या खेळाडूंवर आपण टीका करू इच्छित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कपिल देव यांनी सांगितले की, ते भारतातून संपूर्ण परिस्थितीकडे पाहत आहेत. इम्रान खान यांच्यासोबत आपण क्रिकेट खेळलो असल्याने सहकाऱ्याच्या नात्याने त्यांना पाठिंबा देण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी नमूद केले.दरम्यान, इम्रान खान यांनी २०१८ ते २०२२ या कालावधीत पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून काम केले. पदावरून पायउतार झाल्यानंतर ते तुरुंगात आहेत. भ्रष्टाचारासह अनेक आरोपांखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून, सध्या ते रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगात आहेत.
यापूर्वी कपिल देव यांच्यासह जगभरातील २१ दिग्गज क्रिकेटपटूंनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना पत्र पाठवून इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती. या पत्रावर सुनील गावस्कर, ग्रेग चॅपेल, इयान चॅपेल, स्टीव्ह वॉ, जॉन राईट, क्लाइव्ह लॉईड आणि अर्जुन रणतुंगा यांच्यासह अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंच्या स्वाक्षऱ्या होत्या. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम आणि वकार युनिस यांच्याशिवाय इतर पाकिस्तानी क्रिकेटपटूंकडून इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत फारशी सार्वजनिक प्रतिक्रिया आलेली नसल्याचेही या पार्श्वभूमीवर नमूद करण्यात आले आहे. कपिल देव यांच्या ताज्या वक्तव्यामुळे इम्रान खान यांच्या परिस्थितीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.