मुंबई
lalbaugcha raja दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात आगमन मिरवणुकीदरम्यान भुलेश्वरचा राजा गणेशाची मूर्ती कोसळून घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेने गणेशोत्सव मंडळावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत गणेशमूर्ती पूर्णपणे भंगली असून दोघांचा मृत्यू झाला. या दुःखद प्रसंगी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मदतीचा हात पुढे केला असून भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाला ११ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत दिली जाणार आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी ही मदत जाहीर केली. त्यांच्या घोषणेनुसार भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाला ११ लाख रुपये देण्यात येणार असून, मूर्ती कोसळून झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे.
भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाने यंदा २७ फुटांची गणेशमूर्ती तयार केली होती. या मूर्तीची आगमन मिरवणूक सुरू असताना अचानक मूर्ती समोरच्या बाजूने झुकली आणि कोसळली. वेल्डिंग तुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि ब्रिजेश जोशी गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.
दरम्यान, भुलेश्वरचा राजा गणेशमूर्ती नेमकी का कोसळली, याबाबत मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून वेगवेगळी कारणे सांगण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्या ठिकाणी मोठा खड्डा होता. या खड्ड्यामुळे मूर्ती एका बाजूला कलंडली आणि त्यानंतर ती कोसळल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
दुसऱ्या एका कार्यकर्त्याने रस्त्यावरील पार्किंगमुळे निर्माण झालेली अडचण आणि रस्त्याची खराब अवस्था याकडे लक्ष वेधले. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने मिरवणुकीदरम्यान अडथळा निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले. या दुर्घटनेनंतर भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना, लालबागचा राजा मंडळाने आर्थिक मदतीचा हात पुढे करत या कठीण प्रसंगी मंडळ आणि मृतांच्या कुटुंबीयांना आधार दिला आहे.