मुंबई
maharashtra rain update राज्यातील अनेक भागांत पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. मात्र, आता अनेक भागांत पावसाचे पुनरागमन झाले असून, हवामान विभागाने घाटमाथा परिसरासाठी पुढील २४ तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असून, या भागांसाठी सध्या कोणताही विशेष हवामान अलर्ट देण्यात आलेला नाही.
मुंबईसह पालघर, ठाणे आणि पनवेल परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील चार ते पाच दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे आणि दमट राहण्याचा अंदाज आहे. या काळात आकाश ढगाळ राहण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा परिसरात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, काही ठिकाणी वादळी पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांत हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस या भागात हवामानात काही बदल होण्याचा अंदाज असून, त्यामुळे या भागांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, काही भागांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही विशेष हवामान अलर्ट देण्यात आलेला नाही.
दरम्यान, धुळे जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने कपाशी आणि मक्यासारखी पिके संकटात आली आहेत. पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या काळातच जमिनीतील ओलावा कमी झाल्याने कुंडाणे शिवारातील बागायती शेतकऱ्यांनी पिके वाचवण्यासाठी कृषी पंपांच्या माध्यमातून पाणी देण्यास सुरुवात केली आहे. ऐन पावसाळ्यात पिकांना पाणी देण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे बळीराजा आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.नाशिक जिल्ह्यातील मनमाड-नांदगाव परिसरातही गेल्या महिन्यापासून पाऊस नसल्याने मका, बाजरी आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका बसत आहे. सध्या पिकांना पाण्याची नितांत गरज असताना विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे भाजीपाला पिकांवरही संकट ओढावले आहे. चांदवड-मनमाड परिसरातील विहिरींची पाणीपातळी खालावल्याने सर्वच पिकांसाठी आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे. त्यामुळे हवामान विभागाने वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून, आगामी काळात पाऊस किती जोर धरतो, यावर खरीप पिकांचे भवितव्य अवलंबून आहे.