दिल्ली
onions देशावर कोणतेही मोठे संकट आले की महाराष्ट्र मदतीसाठी धावून जातो, अशी भावना व्यक्त केली जाते. राजधानी दिल्लीवर संकट आले की महाराष्ट्राने कणा बनून साथ दिल्याची उदाहरणेही दिली जातात. त्यामुळेच ‘हिमालयासाठी सह्याद्री धावतो’ असे म्हटले जाते. आता दिल्लीतील कांद्याच्या वाढत्या दराचे संकट दूर करण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातून आज दिल्लीला ८४० टन कांदा पाठवण्यात येणार असून, लासलगावहून हा कांदा रेल्वे मालगाडीने दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहे. या कांदा पुरवठ्यामुळे दिल्लीतील टंचाई कमी होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.
दिल्लीकरांना वाढलेल्या कांद्याच्या दरापासून दिलासा देण्यासाठी लासलगाव रेल्वे स्थानकातून ८४० टन कांदा दिल्लीला पाठवण्यात येणार आहे. यासाठी २१ व्हेगनची रेल्वे मालगाडी लासलगाव रेल्वे स्थानकात दाखल झाली आहे. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास ट्रकद्वारे आणलेल्या कांद्याचे मालगाडीत लोडिंग सुरू होणार आहे. रात्री उशिरापर्यंत कांदा लोडिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर ही मालगाडी दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहे.
सध्या दिल्लीमध्ये कांद्याचा दर २५ ते ३० रुपयांच्या दरम्यान ठेवून हा कांदा उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे दिल्लीकरांना वाढत्या दरातून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कांदा दिल्लीला पाठवण्यात येत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे. या अतिरिक्त पुरवठ्याचा स्थानिक बाजारातील कांद्याच्या दरावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, दिल्लीत गेल्या दोन आठवड्यांपासून कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सुरुवातीला बाजारात १५ ते २० रुपये किलो दराने मिळणारा कांदा आता सुमारे ५० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात तब्बल ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. वेळेवर कांद्याचा पुरवठा झाला नाही, तर दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
एका कांदा विक्रेत्याच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी कांदा २० ते २५ रुपये किलो दराने विकला जात होता. आता तो ३० रुपये किलो दराने विकला जात आहे. मात्र, मंडईतच कांदा ५० रुपये किलो दराने मिळत असल्याने ग्राहकांना तो ६० ते ६२ रुपये किलो दराने विकावा लागत आहे.
दिल्लीतील कांद्याच्या दरवाढीमागे पुरवठ्यात झालेली मोठी घट हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीच्या आझादपूर मंडईत दररोज सुमारे १०० ट्रक कांदा येत होता. मात्र, सध्या केवळ ४० ट्रक कांदा मंडईत दाखल होत आहे. त्यामुळे बाजारातील कांद्याचा पुरवठा हळूहळू कमी होत असून, उपलब्ध साठाही घटत आहे. परिणामी कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, पावसामुळे कांद्याच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी पुरेसा कांदा उपलब्ध नाही. शेतीचे नुकसान झाल्याने मंडईपर्यंत कांद्याचा पुरवठाच कमी झाला आहे. परिणामी सध्या जुन्या साठ्यावर बाजाराची भिस्त आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी महाराष्ट्रातून ‘कांदा एक्स्प्रेस’द्वारे कांदा पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज या कांदा एक्स्प्रेसची पहिली खेप दिल्लीच्या दिशेने रवाना होणार असून, त्यातून ८४० टन कांदा दिल्लीला पोहोचणार आहे.