विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; नववी-अकरावीतच बोर्ड नोंदणी

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
शिमला,
Major change by Himachal Board हिमाचल प्रदेश शालेय शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या नोंदणी प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. आता मंडळाशी संलग्न सरकारी तसेच खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांची नोंदणी दहावी आणि बारावीऐवजी नववी आणि अकरावीच्या वर्गातच केली जाणार आहे. बोर्ड परीक्षेच्या काळात निर्माण होणाऱ्या तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. एचपीबीओएसईचे अध्यक्ष डॉ. राजेश शर्मा यांनी परीक्षा कायदा, १९९४ मधील प्रकरण १८च्या नियम १८.१ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेची माहिती दिली. या नव्या तरतुदीनुसार मंडळाशी संलग्न सर्व शाळा आणि संस्थांमधील विद्यार्थ्यांना नोंदणीच्या नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. नववीतील विद्यार्थ्यांची नोंदणी दहावीची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत वैध राहणार आहे. त्याचप्रमाणे अकरावीत झालेली नोंदणी बारावीची वरिष्ठ माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत लागू राहील.
 
 
Major change by Himachal Board
 
 
दुसऱ्या बोर्डातून किंवा इतर मंडळांतर्गत शिक्षण घेतल्यानंतर एखादा विद्यार्थी थेट दहावी किंवा बारावीमध्ये प्रवेश घेत असल्यास त्याची एचपीबीओएसईकडे नव्या उमेदवाराप्रमाणे नोंदणी केली जाईल. अशा विद्यार्थ्यांची नोंदणी बोर्डाने निश्चित केलेल्या प्रक्रियेनुसार स्वतंत्रपणे पूर्ण करावी लागणार आहे.मंडळाने प्रत्येक विद्यार्थ्यासाठी २०० रुपये नोंदणी शुल्क निश्चित केले आहे. संलग्न शाळांना १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत कोणतेही विलंब शुल्क न भरता नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. त्यानंतर नोंदणी केल्यास ५०० रुपये विलंब शुल्क आकारले जाईल. विलंब शुल्कासह नोंदणीची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. या मुदतीनंतर बोर्ड अध्यक्षांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
 
 
नव्या व्यवस्थेनुसार शाळांचे प्राचार्य आणि प्रमुख यांनी पात्र विद्यार्थ्यांची नोंदणी निर्धारित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे. नोंदणीचे संपूर्ण वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले जाणार आहे. शाळांना ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची माहिती भरावी लागणार असून, स्कूल लॉगिनद्वारे वैयक्तिक, शैक्षणिक तसेच विषयाशी संबंधित तपशील नोंदवला जाणार आहे.दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या वेळी विद्यार्थ्यांची नोंदणी करताना उद्भवणाऱ्या तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे हिमाचल बोर्डाने स्पष्ट केले आहे. नववी आणि अकरावीमध्येच विद्यार्थ्यांची पूर्वनोंदणी झाल्यामुळे पुढील काळात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांची प्रक्रिया अधिक सुरळीत करण्यास मदत होईल.