युद्धानंतर पहिल्यांदाच दिसले मोजतबा खामेनेई video

आवाजही पहिल्यांदाच ऐकू आला

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
तेहरान,
Mojtaba Khamenei seen for first time इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा अली खामेनेई यांचा युद्धानंतरचा एक दुर्मिळ व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ते धार्मिक शैक्षणिक सत्राचे अध्यक्षस्थान भूषवताना दिसत असून, त्यांचा आवाजही प्रथमच सार्वजनिकपणे ऐकायला मिळाला आहे. इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाबाबत आणि मोजतबा यांच्या प्रकृतीबाबत चर्चा सुरू असतानाच हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. इराणच्या न्यूज एजन्सीने प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओमध्ये ५६ वर्षीय मोजतबा खामेनेई एका विद्यार्थ्याचा प्रबंध ऐकताना दिसतात. त्यानंतर ते विद्यार्थ्याच्या मांडणीवर आपले मत व्यक्त करतात. संबंधित विद्यार्थ्याच्या प्रबंधाला त्यांनी २० पैकी १९.५ गुण दिले असून, त्याचे काम ‘निर्दोष’ असल्याचे म्हटले आहे. याचवेळी ते विद्यार्थ्यांना इराणी सरकारच्या ‘इस्लामिक सुरक्षा मॉडेल’विषयी माहिती देतानाही ऐकू येतात.
 
Mojtaba Khamenei seen for first time
 
 
मात्र, हा व्हिडिओ नेमका कधी चित्रित करण्यात आला, याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा व्हिडिओ सध्याचा आहे की पूर्वीचा, याबाबत स्पष्टता नाही. युद्ध सुरू झाल्यापासून मोजतबा खामेनेई सार्वजनिकरित्या दिसलेले नसल्याने त्यांच्या या व्हिडिओकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात मोजतबा खामेनेई गंभीर जखमी झाल्याचे अनेक अमेरिकी अधिकारी आणि माध्यमांच्या वृत्तांमध्ये म्हटले आहे. त्यांच्या चेहऱ्याला आणि पायांना गंभीर दुखापत झाल्याचे दावे करण्यात आले असून, ते अद्याप उपचार आणि पुनर्वसनातून जात असल्याचेही वृत्त आहे. सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य तेहरानमधील सर्वोच्च नेत्यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यात मोजतबा यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच त्यांच्या एका किंवा दोन्ही पायांनाही मोठी दुखापत झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या दाव्यांबाबत इराणकडून अधिकृतपणे सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.