गोंदिया
Gondia MLA Rahangdale तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाच्या व महत्त्वाकांक्षी मानल्या जाणार्या निमगाव (आंबेनाला) प्रकल्पाच्या वन वळतीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी आणि प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला गती मिळावी, यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली तीव्र झाल्या आहेत. यासंदर्भात सोमवारी २५ ऑगस्ट रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाचे सचिव एकनाथ डवले यांची भेट घेऊन आमदार विजय रहागंडाले यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
निमगाव (आंबेनाला) प्रकल्प हा या परिसरातील शेती आणि नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. मात्र, वन वळतीकरणाची प्रक्रिया प्रलंबित असल्याने पुढील कार्यवाहीत अडथळे येत होते. सोमवारी झालेल्या बैठकीत या प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रलंबित मुद्दे आणि वन वळतीकरणाच्या प्रक्रियेतील तांत्रिक व प्रशासकीय अडचणींवर सचिव डवले यांच्याशी सखोल चर्चा झाली. संबंधित विविध विभागांमध्ये सुयोग्य समन्वय साधून ही वन वळतीकरणाची प्रक्रिया तातडीने मार्गी लावावी, जेणेकरून प्रकल्पाचे काम विनाविलंब सुरू करता येईल, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. जलसंपदा विभागाचे सचिव डवले यांनी संपूर्ण विषयाचे गांभीर्य लक्षात घेत, प्रकल्पाच्या आढाव्यानंतर आवश्यक ती सर्व प्रशासकीय कारवाई प्राधान्याने करण्याबाबत अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. निमगाव (आंबेनाला) प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होऊन तिरोडा-गोरेगाव क्षेत्रातील शेतकरी व स्थानिक नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, यासाठी शासनस्तरावर सातत्याने आणि भक्कम पाठपुरावा सुरू असल्याने या प्रकल्पाला आता गती मिळणार आहे.