परीक्षा रद्द करा, फेरपरीक्षा घ्या!

MPSC विद्यार्थ्यांची राज ठाकरेंकडे मागणी

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
मुंबई,
MPSC students' demand to Raj Thackeray महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या प्रकरणावरून विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली. विद्यार्थ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून परीक्षा रद्द करावी आणि फेरपरीक्षा घ्यावी, अशी मागणी करणारे निवेदन राज ठाकरे यांना दिले.विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात २० मार्च २०२६ रोजी, म्हणजे नियोजित परीक्षेच्या दोन दिवस आधी मूळ प्रश्नपत्रिका WhatsApp वर लीक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. परीक्षेतील तब्बल ९० प्रश्न आणि त्यांचे पर्याय तंतोतंत जुळत असल्याचे पुरावे उपलब्ध असल्याचे विद्यार्थ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यानंतर २२ मार्च २०२६ रोजी MPSCकडून नियोजित स्क्रीनिंग परीक्षा घेण्यात आली.
 
 
 
mpsc
 
या प्रकरणासंदर्भात २१, २३ आणि २४ जुलै २०२६ रोजी विद्यार्थ्यांनी MPSC आयोग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रारी दाखल केल्याचे निवेदनात म्हटले आहे. डिजिटल पुरावे, मूळ चॅट्स, स्क्रीनशॉट्स तसेच संशयास्पद प्रमाणपत्रांशी संबंधित कागदपत्रे संबंधित विभागांकडे सादर केल्याचा दावाही विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या पाठपुराव्यानंतर २७ जुलै २०२६ रोजी MPSCने चौकशीचे आदेश दिले, मात्र भरती प्रक्रिया अद्याप थांबवण्यात आलेली नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.या पार्श्वभूमीवर चौकशी पूर्ण होईपर्यंत औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी, अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच २२ मार्च रोजी झालेली परीक्षा पूर्णपणे रद्द करून पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
 
 
पेपरफुटीच्या कथित प्रकरणाची स्वतंत्र आणि वेळेत पूर्ण होणारी CID किंवा न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या प्रकरणात दलाल, खासगी अकॅडमी, संस्थाचालक किंवा संबंधित अधिकारी सहभागी असल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. काही उमेदवारांनी सादर केलेल्या संशयास्पद दिव्यांग आणि अन्य प्रमाणपत्रांची फॉरेन्सिक तसेच वैद्यकीय मंडळामार्फत स्वतंत्र तपासणी करण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे.विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. पेपरफुटीच्या मूळ प्रश्नावर भाष्य होणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील, असे म्हटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
जर या प्रकरणावर कारवाई झाली नाही आणि विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे त्यांच्या पाठीशी उभे राहतील, अशी भूमिका संदीप देशपांडे यांनी मांडली. विद्यार्थ्यांच्या निवेदनात हा प्रश्न केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. औषध निरीक्षक हे राज्यातील औषध नियंत्रण आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित महत्त्वाचे पद असल्याने भरती प्रक्रियेत पारदर्शकता असणे आवश्यक असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे कथित पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई आणि प्रामाणिक उमेदवारांना न्याय मिळावा, अशी त्यांची मागणी आहे.