मुंबई,
New team for Maharashtra BJP आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षसंघटनेत फेरबदलांना सुरुवात केली आहे. केंद्रीय पातळीवरील बदलांनंतर आता महाराष्ट्र भाजपकडूनही प्रदेश प्रकोष्ठांच्या प्रभारी आणि सहप्रभारींच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी या नियुक्त्यांची घोषणा केली.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने नुकतीच राष्ट्रीय पातळीवरील पक्षसंघटनेतील नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातही संघटनात्मक पातळीवर बदल करण्यात आले आहेत. पक्षाच्या विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या प्रकोष्ठांची जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. विधी प्रकोष्ठाची जबाबदारी भूषण महाडिक यांच्याकडे देण्यात आली असून, बुद्धिजीवी प्रकोष्ठाचे प्रभारी विश्वास पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्योग प्रकोष्ठाची जबाबदारी प्रदेश सह-कोषाध्यक्ष आमदार अरुण लखानी यांच्याकडे, तर वैद्यकीय प्रकोष्ठाची जबाबदारी डॉ. भारती पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सहकार प्रकोष्ठासाठी आमदार प्रवीण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पक्षाच्या विविध आघाड्या आणि विभागांमध्ये संघटनेचा प्रभाव वाढवणे तसेच संबंधित क्षेत्रातील कार्यकर्ते आणि संघटनांशी समन्वय साधणे, अशी प्रकोष्ठांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे आगामी काळातील पक्षसंघटनेच्या दृष्टीने या नियुक्त्यांना महत्त्व दिले जात आहे.
भाजपने जाहीर केलेल्या नियुक्त्यांनुसार सांस्कृतिक प्रकोष्ठाची जबाबदारी आशीष शेलार यांच्याकडे, शिक्षक प्रकोष्ठ आणि पदवीधर प्रकोष्ठाची जबाबदारी सुनील लोंढा यांच्याकडे देण्यात आली आहे. व्यापार प्रकोष्ठाचे प्रभारी किरीट भंसाली, आर्थिक प्रकोष्ठाचे मिलिंद कानडे, मच्छीमार प्रकोष्ठाचे चेतन पाटील, बुनकर प्रकोष्ठाचे मनोज द्विवटे आणि कामगार प्रकोष्ठाचे मिलिंद तुळसकर असतील.उत्तर भारतीय प्रकोष्ठासाठी आर. डी. यादव, भटके-विमुक्त प्रकोष्ठासाठी प्रदेश उपाध्यक्ष गोपीचंद पडळकर, तर दिव्यांग प्रकोष्ठासाठी डॉ. भागवत कराड यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग प्रकोष्ठाच्या सहप्रभारीपदाची जबाबदारी जयसिंग कुणावर चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे. आध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठाचे तुषार भोसले, ट्रान्सपोर्ट प्रकोष्ठाचे अनूप मोरे, दक्षिण भारतीय प्रकोष्ठाचे राजेश पिल्ले आणि बेटी बचाओ-बेटी पढाओ प्रकोष्ठाच्या अल्पा अगरवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जैन समाज प्रकोष्ठाची जबाबदारी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.सेवाभावी संस्था संपर्क प्रकोष्ठासाठी डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकोष्ठासाठी आमदार सुनील कर्जतकर, तर आयुष्मान भारत प्रकोष्ठासाठी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्राम विकास व पंचायतराज विभाग प्रकोष्ठाची जबाबदारी सुधाकर भोंयर यांच्याकडे देण्यात आली आहे.
सोशल मीडिया प्रकोष्ठासाठी प्रदेश प्रवक्ता श्वेता शालिनी, फ्रेंड्स ऑफ बीजेपी प्रकोष्ठासाठी उषा वाजपेयी आणि आयटी प्रकोष्ठासाठी तेजस मालवीया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्रीडा प्रकोष्ठाची जबाबदारी केदार जाधव यांच्याकडे देण्यात आली आहे. बंगाली प्रकोष्ठासाठी शुभानत दास आणि रेल्वे प्रवासी प्रकोष्ठासाठी कैलास वर्मा यांची निवड करण्यात आली आहे. अभियंता प्रकोष्ठासाठी आमदार प्रशांत ठाकूर, राजस्थानी प्रकोष्ठासाठी देवसिंग पुरोहित आणि मीडिया प्रकोष्ठासाठी प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुशासन प्रकोष्ठाची जबाबदारी प्रदीप पेशकार यांच्याकडे, तर परराष्ट्र संबंध विभाग प्रकोष्ठासाठी प्रदेश सरचिटणीस आमदार सुनील राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तृतीयपंथी प्रकोष्ठाची जबाबदारी डॉ. सावी जेडवा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.