मुंबई
nia सायबर दहशतवादाशी संबंधित प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) पाच राज्यांतील पाच ठिकाणी व्यापक छापेमारी केली आहे. गुजरात सायबर दहशतवाद प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून करण्यात आलेल्या या कारवाईत महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नरसह गुजरातमधील नडियाद, तेलंगणातील रामागुंडम, बिहारमधील गोपालगंज आणि दिल्ली येथे छापे टाकण्यात आले. या कारवाईत महत्त्वाचे डिजिटल साहित्य आणि आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, सायबर हल्ल्यांसाठी आरोपींना तांत्रिक मदत आणि प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध तपासातून लागला आहे.
या प्रकरणात यापूर्वीच दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान देशातील काही शहरांमधून आरोपींना तांत्रिक मदत पुरविणारे तसेच हल्ल्यांसाठी प्रशिक्षण देणारे घटक समोर आले आहेत. त्यांचा सहभाग आणि नेटवर्क याबाबत NIAकडून पुढील तपास सुरू आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील जुन्नर परिसरातही या कटाशी संबंधित हालचाली झाल्याचे तपासातून समोर आले आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान केंद्र सरकारच्या 54 वेबसाइट्सना DDoS हल्ल्याद्वारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सरकारी महत्त्वाच्या संगणकीय संसाधनांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासातून सायबर दहशतवादाची नवी मोडस ऑपरेंडी समोर आली असून, प्रशासकीय वेबसाइट्स आणि लिंकवर हल्ले करण्याच्या प्रयत्नांचा तपास यंत्रणांकडून करण्यात येत आहे.
देशभरातील या छापेमारीदरम्यान तीन लॅपटॉप, पाच मोबाईल फोन, पेन ड्राइव्ह तसेच अन्य डिजिटल उपकरणे आणि आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या डिजिटल सामग्रीच्या तपासातून हल्ल्यांमागील व्यक्ती, त्यांना मिळणारे तांत्रिक सहकार्य आणि संबंधित नेटवर्कबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.
गुजरात एटीएसने दाखल केलेल्या प्रकरणाचा तपास सध्या NIAकडून सुरू आहे. देशांतर्गत सुरू असलेल्या सायबर दहशतवादी कारवायांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेची सातत्याने नजर असून, या कारवाईच्या माध्यमातून सरकारी संगणकीय यंत्रणा आणि वेबसाइट्सना लक्ष्य करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत.
मुंबईवरील 2008च्या nia दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा कायदा, 2008 अंतर्गत NIAची स्थापना करण्यात आली. देशाची सुरक्षा आणि एकात्मतेला धोका निर्माण करणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करणारी ही भारताची केंद्रीय दहशतवादविरोधी तपास संस्था आहे. सायबर दहशतवादाच्या या प्रकरणातील पुढील तपासात आरोपींना मदत करणाऱ्या अन्य व्यक्तींची भूमिका आणि त्यांचे नेटवर्क उघड होण्याची शक्यता आहे.