यकृताचा अंश दान करून निकीता ने वडिलांना दिले नवजीवन

अवयवदानाचा समाजासमोर ठेवला प्रेरणादायी आदर्श

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
वाशीम,
donating a portion of her liver ज्या हाताने बापाचे बोट धरून लेक चालायला शिकली, त्याच बापाच्या आयुष्याची वाट खडतर झाली तेव्हा हीच लेक त्यांच्यासाठी जीवनदायिनी ठरली. गंभीर आजारामुळे वडिलांचे यकृत निकामी होण्याच्या मार्गावर असताना निकीता संजीवकुमार नांदगावकर यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या यकृताचा एक भाग वडिलांना दान करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि वडिलांना नवजीवन मिळाले. वडील-लेकीच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि धैर्याची ही कहाणी आता अवयवदानाबाबत समाजाला प्रेरणा देणारी यशोगाथा ठरली आहे.
 
 
donating a portion of her liver
 
संजीवकुमार नांदगावकर यांना गंभीर आजाराने गाठले होते. यकृताची कार्यक्षमता खालावत गेल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या संकटामुळे संपूर्ण कुटुंबावर चिंतेचे सावट होते. उपचारांसाठी यकृत प्रत्यारोपणाची गरज असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कुटुंबासमोर मोठे आव्हान उभे राहिले. या कठीण परिस्थितीत निकीता यांनी स्वतःच्या यकृताचा एक भाग वडिलांना दान करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केवळ भावनिक नव्हता, तर त्यासाठी मोठे धैर्य आणि मानसिक तयारी आवश्यक होती. शस्त्रक्रियेची भीती, स्वतःच्या आरोग्याची चिंता या सगळ्यांवर मात करत त्यांनी वडिलांचे जीवन वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले.
 
 
मुलगी म्हणजे केवळ माहेरातून सासरी गेलेले नाते नाही, तर गरजेच्या वेळी आपल्या माणसांसाठी सर्वस्व पणाला लावणारी शक्ती आहे, हे निकीताने कृतीतून दाखवून दिले. वडिलांनी आयुष्यभर तिच्यासाठी केलेल्या त्यागाची परतफेड तिने आपल्या परीने केली. स्वतःच्या शरीरातील यकृताचा एक भाग वडिलांना दान करून त्यांना जीवनदान देणे ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नव्हती; त्यामागे होते निस्सीम प्रेम, कुटुंबाप्रती असलेली जबाबदारी आणि संकटावर मात करण्याचे अदम्य धैर्य.
 
 
निकीता नांदगावकर यांच्या या निर्णयामुळे एका कुटुंबात आनंद परतला असला, तरी त्यातून समाजासाठीही महत्त्वाचा संदेश पुढे आला आहे. अवयवदानाबाबत जनजागृती होणे आणि त्यासंदर्भातील गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. योग्य वैद्यकीय मार्गदर्शन आणि निर्धारित प्रक्रियेतून केलेले अवयवदान एखाद्या गरजू व्यक्तीसाठी जीवनाची नवी आशा ठरू शकते. वडिलांसाठी स्वतःच्या शरीराचा एक भाग देणारी ही लेक केवळ आपल्या कुटुंबाची नव्हे, तर समाजाच्या स्मरणात राहणार्‍या माणुसकीची यशोगाथा ठरली आहे.