ओबीसी नेत्यांमध्येच फूट, दोघांमध्ये जुंपली

लक्ष्मण हाकेंच्या मुंबई मोर्चाला तायवाडेंचा विरोध

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
मुंबई
obc leaders ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी १ सप्टेंबर रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चासाठी हाके यांनी जोरदार तयारी सुरू केली असून, प्रत्येक ओबीसी बांधवाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच ओबीसी समाजातील सर्व नेत्यांनीही मोर्चात सहभागी व्हावे, असे आवतन त्यांनी दिले आहे. मात्र, मोर्चाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद उफाळून आले आहेत. ओबीसींचे दुसरे आक्रमक नेते आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी या मोर्चाला आमचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे १ सप्टेंबरच्या मोर्चापूर्वीच ओबीसी समाजात फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
 

obc leaders divided ahead of lakshman hake 
मुंबई जाम करायची असेल तर त्यांनी करावी, तो त्यांचा प्रश्न आहे. आपण मात्र सरकारच्या भूमिकेकडे लक्ष देत असल्याचे बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे. सरकार लक्ष्मण हाके यांच्या मागण्यांकडे किती गांभीर्याने पाहते, तसेच ओबीसींच्या आरक्षणाला कुठे धक्का लागतो आहे का, याकडे आमचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने आम्हाला दिलेल्या वचन आणि आश्वासनाला धक्का लागणार नाही, असे स्पष्ट केले आहे. सरकार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले तर आमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. त्यामुळे आम्हाला मुंबई जाम करण्याची गरज नाही. आमचा मुंबईतील मोर्चाला पाठिंबा नाही. त्यांच्या मागण्या स्पष्ट नाहीत, अशी भूमिका तायवाडे यांनी मांडली.
याचवेळी ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीवरही तायवाडे यांनी भूमिका स्पष्ट केली. २०१६ पासून केंद्र सरकारकडे जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात आहे. वर्षभरापूर्वी सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचे जाहीर केले होते. मात्र, सध्या होणारी जनगणना पूर्णपणे जातनिहाय होत नसून अर्जात केवळ जातीचा कॉलम टाकण्यात आला आहे; त्यात ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे आमची अर्धी मागणी पूर्ण झाली आहे, मात्र ओबीसींचा कॉलम समाविष्ट झालेला नाही, असे तायवाडे यांनी सांगितले. ओबीसींचा स्वतंत्र रकाना जनगणनेत समाविष्ट करण्यासाठी भविष्यात सातत्याने पाठपुरावा केला जाईल. त्यासाठी डिसेंबरमध्ये दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करण्यात येणार असून, ओबीसींचा कॉलम जनगणनेत समाविष्ट करण्याची मागणी लावून धरली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, तायवाडे यांच्या या भूमिकेवर लक्ष्मण हाके यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. बबनराव तायवाडे हे ‘इव्हेंट नेते’ आहेत. ते सकाळी एक भूमिका, दुपारी दुसरी आणि संध्याकाळी वेगळी भूमिका घेतात, अशी टीका हाके यांनी केली. आम्ही त्यांना पाठिंबा मागितलाच नाही. ते नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असतात. वर्षाला एकच कार्यक्रम घेणाऱ्या बबनराव तायवाडे यांनी मला जास्त बोलायला लावू नये, असा इशाराही हाके यांनी दिला.
लक्ष्मण हाके यांनी १ सप्टेंबर रोजी मुंबईत मोर्चाची हाक दिली असून, त्यासाठी ओबीसी समाजातील नेत्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे देखील या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत. मात्र, तायवाडे यांनी मोर्चाला पाठिंबा नसल्याची भूमिका घेतल्याने मोर्चापूर्वीच ओबीसी नेत्यांमधील विसंवाद समोर आला आहे. हाके आणि तायवाडे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेतृत्वातील मतभेद अधिक ठळक झाले असून, १ सप्टेंबरच्या मोर्चाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.